18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरसोलापूरातील बागा ओसाड, महापालिकेचे दुर्लक्ष

सोलापूरातील बागा ओसाड, महापालिकेचे दुर्लक्ष

सोलापूर : सोलापूर शहरातील उद्यानांच्या नैसर्गिक सौंदर्यात वाढ होऊन ती फुलविण्यासाठी किमान दीड ते दोन हजार झाडे व फुलझाडे शहरांतील उद्यानांमध्ये लावण्याची गरज आहे. शहरातील उद्यानांची सध्य: स्थिती पाहता, प्रत्येक उद्यानात किमान १०० ते १५० विविध प्रकारची झाडे लावण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

उद्यानांमध्ये पुन्हा हिरवळ व सौंदर्य वाढवण्यासाठी सर्व उद्यानांमध्ये फुलझाडांची लागवड व त्यांची देखभाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान पंधरा दिवस आधीपासून तयारी करणे आवश्यक आहे. सोलापुरातील मोजक्या पाच ते सहा उद्यानांमध्ये सध्या हिरवळ व फुलांची झाडे शिल्लक आहेत. यामध्ये दमाणीनगर येथील सावरकर उद्यान, कर्णिकनगर उद्यान, हुतात्मा उद्यान, रूपाभवानी उद्यान यांसारख्या उद्यानाचा समावेश आहे. उर्वरित नाना-नानी उद्यान, साधु वासवानी उद्यान, मुदगल उद्यान, माटे बगीचा, श्रीशैल उद्यान, सुभाष उद्यान यांसह इतरही अनेक ठिकाणच्या उद्यानातील फुलझाडे व हिरवळ सध्या नाहीशी झाली आहे. त्यामुळे शहरातील उद्यानांची संख्या व सध्याची स्थिती पाहता, सर्व उद्यानात लावण्यासाठी किमान १५०० ते २००० फुलझाडे लावण्याची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने आवश्यक तयारी सुरू करणे गरजेचे आहे.

पिंपळ, आंबा, चिंच अशा झाडांमुळे ऑक्सिजनवृद्धी होते. या झाडांच्या लागवड व देखभाल खर्च सुद्धा कमी येतो. झाडे लागवडी वेळेस वापरण्यात येणा-या खतांकडे सुद्धा लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सोलापूर उष्णकटिबंध भाग असल्याने कमी पाणी लागेल अशी देशी झाडांची लागवड सोयीची राहील. ठराविक उद्यानांमधे झाडांची संख्या ही इष्टतम असावी, जेणेकरून पक्षी वास्तव्यसुद्धा वृद्धिंगत होण्यात मदत होईल व वाढत्या उन्हाची झळ कमी पोचेल असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

सोलापुरातील बहुतांश बागा सध्या ओसाड अवस्थेत आहेत. बागेत विदेशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. विदेशी झाडांच्या आम्लयुक्त पानामुळे जमीन नपीक होत आहे. या झाडांच्या फुलात परागकण नाहीत, त्यामुळे त्यावर फुलपाखरांसारखे कीटक येत नाहीत, पक्षी घरटी करत नाही. त्यामुळे महापालिकेने उद्यानात स्वदेशी आणि फुलांची झाडे लावण्यात यावीत अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील उद्याने पुन्हा फुलझाडांनी फुलविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. उद्याने फुलविण्यासाठी मोठ्या संख्येने रोपांची आवश्यकता असून त्यासाठी किमान ५-७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पावसाळ्यापूर्वी या रोपांची लागवड नक्कीच पूर्ण होईल. त्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे असे महापालिका सहायक उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर यांनी सांगीतले.

नाना-नानी उद्यान, सात रस्ता २०० फुलझाडे,साधू वासवानी उद्यान, गुरुनानक चौक १५० फुलझाडे, मुदगल उद्यान, पाथरूट चौक २०० फुलझाडे , माटे उद्यान, निराळे वस्ती ३०० फुलझाडे, सुभाष उद्यान, रविवार पेठ २५० फुलझाडे, मार्कंडेय उद्यान, अशोक चौक – २०० फुलझाडे , जानकीनगर उद्यान, जुळे सोलापूर – २५० फुलझाडे सर्व उद्यानात १५०-२०० फुलझाडे लावण्याची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR