नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या १९ एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. पण, या निवडणुकीपूर्वीच पुढील पंतप्रधान कोण असेल, अशी देशभरात चर्चा सुरू आहे. अशातच, भारताचे माजी पंतप्रधान आणि कर्नाटकातील जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीवर टीका करताना देवेगौडा म्हणतात, विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्यात भारताचा पंतप्रधान होण्याची क्षमता नाही. नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी, हेच एकमेव पर्याय आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान होतील, कारण संपूर्ण देशाचा त्यांना पांिठबा आहे. जेडीएस आणि भाजप लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करतील.
कर्नाटकला २०० वर्षांत न्याय मिळाला नाही’
कर्नाटकात काँग्रेसच्या न्याय देण्याच्या आश्वासनाचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, गेल्या २०० वर्षांपासून कर्नाटकाला न्याय मिळाला नाही. कावेरी पाणी वादाचा संदर्भ देत ते म्हणाले की, आता तो सुटेल अशी आशा आहे. कर्नाटकला न्याय देऊन कावेरी समस्येचे निराकरण कोणी करू शकत असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आमचे दोन्ही पक्ष एकत्र राहतील आणि मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील असेही ते यावेळी म्हणाले.