पिंपरी : तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदी. साधारण १६ किलोमीटर अंतर. इंद्रायणी नदीच्या सानिध्यातील स्थाने. त्यादरम्यान नदीच्या दक्षिण तीरावर उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि उत्तर तीरावर अनेक गावे, खेडी आहेत. दोन्ही परिसरात सुमारे दहा हजारांवर छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यातील रसायनयुक्त सांडपाण्यावर सध्या कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.
घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करत असल्याचा महापालिकेचा दावा आहे. पण मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्याने नदीतील प्राणवायूच नष्ट झाला आहे. मृतावस्थेत ती वाहत असून, एकप्रकारे तिचा खूनच केला आहे.
कारण, इंद्रायणीच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य असून, रासायनिक व जैवरासायनिक घटकांचे प्रमाण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकापेक्षा अनुक्रमे १४ आणि सहा पट अधिक आहे. असे असतानाही नदीचे मारेकरी उघड माथ्याने फिरत असून, प्रशासनाकडून कठोर कारवाईऐवजी केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत.