24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीमतविभाजन टाळण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न

मतविभाजन टाळण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न

सुधीर गो. बोर्डे
परभणी : परभणी लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी उबाठा व रासप या दोन प्रमुख पक्षांसह तब्बल ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खा. संजय जाधव व राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यात प्रमुख लढत झाली होती. या निवडणुकीत वंचितचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार विटेकर यांना बसून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार खा. संजय जाधव व महायुतीचे उमेदवार तथा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यात प्रमुख लढत असून वंचितकडून पंजाब डख तर बसपाचे आलमगीर खान व अन्य २१ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे वंचित, बसपा व अपक्ष उमेदवारांना मिळणा-या मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रमुख उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार खा. संजय जाधव यांच्यासाठी उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या सभा होणार आहेत. याशिवाय खा. फौजिया खान, आ. सुरेश वरपूडकर, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. विजयराव गव्हाणे, माजी आ. विजय भांबळे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणूक प्रचारार्थ उतरले आहेत. तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २० एप्रिलला सभा होणार आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, आ. मेघना बोर्डीकर, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, माजी जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर हे रासपचे अध्यक्ष जानकर यांच्या पाठीशी आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार खा. संजय जाधव यांचे चिन्ह ‘मशाल’ असून महायुती उमेदवाराचे चिन्ह ‘शिट्टी’ आहे.

हे दोन्ही चिन्ह मतदारांसाठी नवीन असल्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शहरी व ग्रामीण भागात महाविकास आघाडी, महायुतीच्या वतीने मोठ्या प्रमाणात नागररिकांशी संपर्क साधण्यात येत आहे. या गाठीभेटीद्वारे कोणतेही मतदान फुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

महाविकास आघाडी, महायुतीच्या प्रमुख उमेदवारांसह वंचितकडून हवामानतज्ज्ञ पंजाब डख, बसपाचे आलमगीर खान, भाकपचे कॉ. राजन क्षीरसागर निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय माजी मंत्री ऍड. गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर, शेतक-यांच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणारे किशोर ढगे, सुभाषदादा जावळे हे अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले असून गावोगावी जाऊन आपला प्रचार करीत आहेत. या अपक्ष उमेदवारांना मानणारा व त्यांच्या पाठीशी राहणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे वंचित, बसपा, भाकप या सर्वांसह अपक्ष उमेदवारांच्या मत विभाजनाचा फटका बसू नये यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार खा. संजय जाधव व महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन हे मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR