नवी दिल्ली : दिल्लीत या वर्षी सुद्धा दिवाळीत श्वास घेण्याची धडपड सुरूच आहे. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. फटाक्यांमुळे दिल्लीत धुक्याचा जाड थर निर्माण झाला आहे. सोमवारी राष्ट्रीय राजधानीतील रस्त्यांवर धुके आणि अत्यंत कमी दृश्यमानता स्पष्टपणे दिसून आला. विशेष म्हणजे, रविवारी दिवाळीतील गेल्या आठ वर्षांतील सर्वोत्तम हवेची गुणवत्ता पाहायला मिळाली, मात्र संध्याकाळी फटाक्यांच्या आवाजामुळे हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) वाढला. सोमवारी सकाळी शहर धुक्याने भरले होते आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, फुफ्फुसांना हानी पोहोचवणाऱ्या पीएम २.५ सारख्या प्रदूषकांमध्ये वाढ नोंदवण्यात आली.
राजधानीत गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने विषारी हवेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने पुन्हा संकटात टाकले आहे. सोमवारी सकाळी दिल्लीतील एक्यूआय ३०० होता. हा एक्यूआय २०२२ च्या आकड्याच्या जवळपास आहे. आम आदमी पार्टी (आप) सरकारने म्हटले आहे की, हवेच्या गुणवत्तेत बिघाड टाळण्यासाठी लादलेले अनेक निर्बंध सुरूच राहतील. सरकार हवाई आणीबाणीचा सामना करण्याचा प्रयत्न करत असल्याने शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लोकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते.