31.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसंपादकीय विशेषआकर्षक रंगावलीच्या दुनियेत...

आकर्षक रंगावलीच्या दुनियेत…

संस्कृतमधील रंगवल्ली या शब्दापासून रांगोळी हा शब्द आला आहे. रांगोळी म्हणजे कला, उत्सव, रंग, पावित्र्य, मांगल्य अशा सर्व भावनांचे प्रकटीकरण होय. सण असो, एखादं शुभकार्य असो रांगोळीशिवाय त्या कार्यक्रमाला पूर्णत्व येतच नाही. दिवाळी तर मुळातच समृद्धीचा आणि भरभराटीचा सण. यावेळी रांगोळी काढणे म्हणजे लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणेच होय. लक्ष्मीच्या स्वागतासाठी सारेच सजलेले असतात. रांगोळी म्हणजे धरतीचे अलंकरण होय. हल्ली घरपुढचं अंगण, अंगणातील तुळशीवृंदावन, या वृंदावनापुढे काढलेली बारीक रेखांची सुंदर रांगोळी असे चित्र पाहायला मिळत नसले तरी फ्लॅटच्या दारासमोर छोट्याशा जागेत रांगोळीच्या रेखीव रेखा काढलेल्या दिसतात. मोठे अंगण आणि तुळशीवृंदावन नसलं तरी घरातील कुंडीसमोर दोन रेघा मारायला गृहिणी विसरत नाही. रांगोळी काढल्यावर मिळणारे समाधान आणि पावित्र्याची जाणीव काढणा-याला नक्की जाणवते.

भारतात अनेक कलांचा उगम झाला. त्याचप्रमाणे प्राचीन इतिहासात रांगोळी या कलेचीही माहिती सापडते. चित्रकला आणि मूर्तीकलेच्या अगोदर रांगोळीची कला असल्याचे पुरावे आहेत. कामसूत्रात ६४ कलांमधील एक कला असा रांगोळीचा उल्लेख आढळतो. इ.स तिस-या शतकात धान्याचाच उपयोग करून रांगोळी काढली जात असे. सरस्वतीच्या मंदिरात शिवाच्या पूजेसाठी फुलांची रांगोळी काढली जात होती. सातव्या शतकातील वरांग चीनमध्ये पंचरंगी चूर्णे, धान्ये, फुले यांचा उपयोग रांगोळी काढण्यासाठी करण्याचा उल्लेख आहे. प्राचीन मराठी वाङ्मयातही रांगोळीचा उल्लेख आढळतो. साधारण दोन हजार वर्षांपूर्वीपासून ही कला प्रचलित आहे. तसेच हिंदू, पारशी, जैन सर्वच धर्मांत ती शुभ मानली जाते. तसेच कोता, नाग, चेंचू ठाकूर आणि कातकरी या आदिवासी जमातींमध्येही रांगोळीचे खूप महत्त्व आहे.
प्रांतानुसार रांगोळीच्या रेखाटनात फरक आहे.

आकृतिप्रधान आणि वल्लीप्रधान असे रांगोळीचे दोन प्रमुख प्रकार आहेत. बिंदू, रेख कोन, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन अशा भौमितिक आकृत्यांचा वापर करून आकृतिप्रधान रांगोळी काढली जाते. ही रांगोळी प्रामुख्याने महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर भारत, दक्षिण भारत येथे काढली जाते. वल्लरीप्रधान म्हणजे फुले-पत्री, पाने, वृक्ष, पशु-पक्षी या आकृत्या असलेली रांगोळी ही प्रामुख्याने बंगाल, ओरिसा, बिहार या राज्यांत काढली जाते. खरी रांगोळी दोन बोटांच्या चिमटीत धरून बारीक रेखा ओढून काढली जाते. पण अलीकडे पाच बोटांची मोठी गालिचासारखी रांगोळी चांगलीच लोकप्रिय आहे. दारापुढे, देवापुढे तुळशी वृंदावनापुढे, औक्षण करताना पाटाभोवती, भोजनावेळी पानाभोवती वेगवेगळी रांगोळी काढली जाते. रांगोळी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार वापरतात. आपल्याकडे पांढरी शुभ्र रांगोळी मिळते ती शिरगोळ्याच्या चूर्णापासून बनतात. कोकणात भाताची फोलपटं चाळून त्याची राख रांगोळी म्हणून वापरतात. दक्षिणेकडे तांदूळपीठी वापरतात. साळी भिजवून पाटावर वाटून त्या पांढ-या द्रव्याचीही रांगोळी बनवतात. काही ठिकाणी संगमरवराचे चूर्ण, चुन्याची भुकटी, मीठ, पाने, धान्ये असे विविध प्रकार रांगोळी काढण्यासाठी वापरतात. प्रांतानुसार रांगोळीची नावेही वेगवेगळी आहेत.

वेगवेगळ्या प्रांतातील रांगोळ्या वेगवेगळ्या असल्या तरी भाव मात्र मांगल्याचा नि पावित्र्याचा असतो. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या वेळी लक्ष्मीला घरी येण्यासाठी आमंत्रण दिले जाते. म्हणून तिच्या स्वागतासाठी दारात रांगोळी काढतात. लक्ष्मीची पावले काढतात. रांगोळीची कला प्रतीकात्मक आहे. म्हणूनच प्रतिभारूपाने भावनाच व्यक्त केल्या जातात. गोवदम, कैद्रवर्धिनी, चंद्र, सूर्य, शंख, स्वस्तिक, गदा, चक्र पद्म, कासव, कोयरी, ओंकार, कलश इत्यादी शुभ चिन्हांची रांगोळी काढली जाते. कमळाचे अनेक प्रकार काढले जातात. ज्ञानकमळ हे त्यापैकीच एक. श्रीसुक्ताची रांगोळी ही काढली जाते. ठिपक्यांची रांगोळी काहीशी गुंतागुंतीची असते. ठिपके सरळ येणे गरजेचे असते. हल्ली छिद्रे असलेला कागद बाजारात मिळतो. त्यामुळे काम सोपे झाले आहे. मोठे गालिचे, पायघड्या ही पद्धतही रूढ झाली आहे. व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रेही काढतात. त्याचे प्रदर्शन भरवतात. पुरुषही यामध्ये उत्साहाने भाग घेतात. हल्ली झटपट रांगोळी हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. रांगोळीचे स्टिकर दारापुढे, उंब-यावर चिकटवले जाते. त्यामुळे बरेच दिवस ही रांगोळी टिकते. धावपळीच्या जीवनात रोज रांगोळी काढता येत नसणा-या स्त्रियांसाठी ही खास सोय आहे. शिवाय रांगोळीचे तयार छापेही बाजारात मिळतात. छाप्यावर रांगोळी टाकली मिनिटात सुंदर रांगोळी तयार. त्यामुळे रांगोळीचे काम खूपच सोपे झाले आहे.

राजस्थानात रांगोळीला ‘मांडना’ म्हणतात. घराच्या भिंती आणि आंगण मातीने प्रथम सारवतात. नंतर त्यावर मोठमोठी चित्रे काढतात. ती मोठी असल्यामुळे बरेचजण मिळून हे चित्र काढतात येथेही तांदळाचे पीठ पाण्यात भिजवून काडीच्या कुंचल्याने चित्र काढतात, प्राणी, पक्षी, वेली, वृक्ष अशी चित्रं काढतात. या रांगोळ्या कलेचा उत्तम नमुना असतात. दक्षिण भारतात ‘कोयाम’ काढले जाते. यात तांदळाची पिठी, गारगोटीची पूड, विटेची पूड वापरून मोठी रांगोळी काढली जाते. या रांगोळ्या फारच मोठ्या असतात. अशा मोठ्या रांगोळ्या काढणे म्हणजे देवाची आराधना केल्यासारखे मानतात. कोलम हे गोलाकार असून सर्व बाजूंनी एकसारख्या आकृत्या काढल्या जातात. यातल्या रेषा जोडून असतात. आत शिरायला जागा नसते. याचा अर्थ म्हणजे कोलममुळे घरात वाईट शक्तीला फिरण्यास जागाच राहत नाही.

– अमृता साठे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR