छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग आणि ८५ वर्षांपुढील मतदारांचे घरबसल्या मतदान करून घेण्यासाठी बीएलओंमार्फत ६८ हजार ९०६ मतदारांकडून डी-१२ हा फॉर्म भरून घेण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदार संघातील ६९९ तर शहरातील तीन मतदार संघातील ६८५ दिव्यांग व ज्येष्ठ मतदार घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
ही एकूण संख्या १,३८४ आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित केले जात आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठांना उन्हाचा त्रास होऊ नये. यासाठी घरबसल्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे; तसेच मतदान केंद्रांवरदेखील खुर्ची, मंडप, पिण्याचे पाणी, पाळणा घराची सोय करण्यात आली आहे.