मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काल मी पुन्हा येईन, असे ट्विट केल्याने राज्यात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावर खुलासा करताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री कायम राहतील. ते एक तर अपात्र ठरणार नाहीत आणि अपात्र ठरलेच तरीदेखील तेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील. त्यासाठी आम्ही त्यांना ६ महिन्यांत विधान परिषदेवर निवडून आणू, असे स्पष्ट करीत त्यांनी त्यांचा बी प्लॅनही उघड केला.
एका खाजगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. मागच्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. त्याबाबतची सुनावणीदेखील आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत यासंबंधीचा निर्णय लागू शकतो. या पार्श्वभूमीवर काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह संबंधित आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्री पदावर इतर नेत्याची वर्णी लागेल, असा दावा विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या सर्व चर्चेवर फडणवीस यांनी पुढचा प्लॅन स्पष्ट केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. परंतु मी याबाबत एक गृहितक म्हणून सांगतो की, एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवले तरी तेच मुख्यमंत्री राहू शकतात. ते सहा महिन्यांत विधान परिषदेवर येतील. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. पण ते अपात्र होणारच नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र होतील, असा तर्क लावणे चुकीचे आहे. आमच्याजवळ बहुमत आहे. त्यामुळे कुणीही अपात्र झाले तरी आम्हाला काही अडचण नाही. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून काम केले आहे. जे काही केले आहे, ते कायद्यानुसारच केले आहे. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
व्हीडीओ टाकून परत येईन का?
प्रदेश भाजपाच्या मी पुन्हा येईन या ट्विटमुळे काल उडालेल्या गोंधळावर सारवासारव करताना कुणाला जर यायचे असेल तर तो व्हीडीओ टाकून येतो का, असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील, याचा त्यांनी पुनरुच्चार त्यांनी केला.