लातूर : प्रतिनिधी
देश व राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी या वर्षाची ‘नीट’ परीक्षा आज दि. ५ मे रोजी होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हजारो विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीला लागले आहत्ो. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांचीदेखील परीक्षाच आहे. जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर २४ हजार ८८१ भावी डॉक्टर ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा घेणा-या यंत्रणेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगुन अनेक विद्यार्थी गेली दोन वर्षे कष्ट घेत आहेत. ‘नीट’ची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या घरात दररोज परीक्षेसारखेच वातावरण राहिले आहे. आज हे विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
या वर्षाची ही परीक्षा आज दि. ५ मे रोजी होत आहे. या परीक्षेकरीता २४ हजार ८८१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत्.ा जिल्ह्यात ५४ परीक्षा केंद्र आहेत. यात लातूर शहरात ४५, निलंगा ३, उदगीर ३, अहमदपूर येथे २ परीक्षा केंद्र आहेत. एनटीएचे पथक लातुरात दाखल झाले आहे. या सर्वच परीक्षा केंद्रांवर संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली आहे. नीट अॅडमिट कार्डची ब्लॅक अॅण्ड व्हाईट किंवा कलर कॉपी काढून घ्यावी, विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डच्या पहिल्या पेजवर सांगीतलेल्या जागी नीट फॉर्म भरत असताना वापरलेला फोटो चिकटवावा, डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा देणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया परीक्षेला जाण्यापुर्वी घरीच करुन घ्यावी. विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवर तीन ठिकाणी सही करायची आहे,
ही प्रक्रिया मात्र परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षकांच्या समोर करावी, अॅडमिट कार्डच्या दुस-या पेजवर पोस्ट कार्ड आकाराचा, नीट फॉर्म भरत असताना अपलोड केलेला फोटो परीक्षेला जाण्यापुर्वीच घरीच चिकटवून घ्यावा. परीक्षेच्या हॉलमध्ये अटेंडन्स शीटवर चिकटवण्यासाठी एक अतिरिक्त पासपोर्ट साईज फोटो जवळ ठेवावा. विद्यार्थ्यांनी ओरिजिनल फोटो आयडी, आधार कार्ड सोबत ठेवावे. कपडे शक्यतो फिकटरंगाचे असावेत. शर्ट व टॉप हाफ बाह्यांचा असणे अनिवार्य आहे. कपड्यांवर शक्यतो मोठे बटन्स, ब्राऊच, मोठे डिझाईन्स असू नयेत. पॉकेट, छोटे बटन, कॉलर किंवा चेन असलेले शर्ट, जीन्स पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट विद्यार्थी परिधान करु शकतात.
चप्पल किंवा कमी उंचीची सँडल घालून जाऊ शकतात. बुट व जास्त उंचीची सँडल घालुन जाता येणार नाही. विद्यार्थ्यांनी हाफ बाह्यांचा टी-शर्ट व नाईट पॅन्ट किंवा ट्रॅक पॅन्ट वापरणे उत्तम राहील. विद्यार्थीनींनी टी-शर्ट किंवा सुती टॉप सोबत लेगिन्स वापरणे उत्तम राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पॅड, पेन, घड्याळ, अशा वस्तू परीक्षा केंद्रात घेऊन जाता येणार नाहीत. पेन एनटीएकडून उपलब्ध करुण देण्यात येईल.