छ. संभाजीनगर : कांदा, शेवगा तसेच आल्याचे दर चढेच आहेत आणि सणासुदीत आवक कमी झाल्याने हे दर पुन्हा जास्त वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र इतर बहुतांश भाज्यांचे दर स्थिर आहे. त्यातल्या त्यात पालेभाज्यांचे दर फळभाज्यांपेक्षा कमी असल्याने सणासुदीत नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
सध्या बाजारात दिवाळीपूर्वी कांद्याची आवक कमी होती त्यामुळे कांद्याचे दर चढेच होते. किरकोळ बाजारात चांगला कांदा ७० ते ८० रुपये किलोने विकला गेला. साहजिकच आवक कमी झाल्याने ठोकचे भावदेखील क्विंटलमागे एक हजार रुपयांनी वाढल्याचे स्पष्ट झाले.
कांद्याप्रमाणेच शेवग्याच्या शेंगांची स्थिती आहे. शेवग्याची सुमारे २०० ते २५० रुपये किलोने किरकोळ विक्री झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय बहुतांश फळभाज्यांची ६० रुपये ते ८० रुपये किलोने, तर बहुतांश पालेभाज्यांची १०ते १५ रुपये जुडीने किरकोळ विक्री होत आहे. तसेच बटाट्यांची सुमारे ३० ते ३५ रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे. दरम्यान, कांदा, शेवग्याची आवक कमी झाल्याने दर वाढलेले आहेत. इतर भाज्यांचे दर ब-यापैकी स्थिर आहेत.
आल्याची तेजी कमी होईना
मागच्या किमान सहा महिन्यांपासून आल्यातील तेजी कायम आहे. पुन्हा सणासुदीत आल्याची आवक कमी झाली असून, त्याचा काहीअंशी फटका किरकोळ दरांवर झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून आल्याची सुमारे ५० ते ६० रुपये पावकिलोने किरकोळ विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.