द. सोलापूर: सोलापूर अक्कलकोट महामार्गाच्या निर्मितीसाठी वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील स्वामी समर्थ सुतमीलसमोर दोन दगड खाणी खोदण्यात आल्या होत्या. त्यातील पाणी गावाला देण्याची मागणी आम आदमीचे संघटन मंत्री प्रसाद बाबानगरे यांनी केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी रेवणसिद्ध पाटील व तलाठी नयना देशपांडे यांनी शंभर दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचा अहवाल शासनाकडे दिला आहे.
सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच आरिफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य शालम अमलिबुंगे, ग्रामपंचायत सदस्य समीर कटरे, संघटनमंत्री प्रसाद बाबानगरे यांच्या उपस्थितीत सदर खाणीची तपासणी करण्यात आली. त्यानुसार २५० फूट लांब, २०० फुट रुंद व सरासरी ७० फुट खोल असे दोन पाणीसाठे आढळून आले. त्यासंदर्भात सरपंच जगदीश अंटद यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत शिष्टमंडळाने तहसीलदार किरण जमदाडे व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांची भेट घेतली. त्यानुसार दोन किलोमीटर अंतराची पाईपलाईन व विद्युत कनेक्शनच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले.
या खाणीतील पाणी ग्रामीण रुग्णालयासाठी वापरण्याची मागणी हुतात्मा जलसंवर्धन समितीने केली होती. शिवकालीन पाणीसाठ्यासारखा याचा वापर करावा.असे हुतात्मा जलसंवर्धन समितीचे सदस्य विरेश बागलकोटी यांनी सांगीतले.
सदर खाणीतील पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी करून घेण्याचे संबंधितांना सांगण्यात आले आहे. खाणीभोवतालच्या परिसराची तपासणी करून पाणी पावसाचेच आहे का याची खात्री करून घेण्यास सांगितले आहे.असे दक्षिण सोलापूरचे तहसीलदारकिरण जमदाडे यांनी सांगीतले.सदर खाणीतील पाणी तातडीने उपलब्ध करून देण्याची उपायोजना करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीने सदर पाणी, पाणी पुरवठा विहीरी भोवतीच्या शोषखड्ड्यात सोडून नैसर्गिक शुद्धीकरण करून घ्यावे, तसेच विहिरीतील पाण्याचेही रासायनिक शुद्धीकरण करावे.असे जिल्हा परिषद सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सांगीतले.