31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्र  पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपची विजयाची हॅट्ट्रिक होणार का?

  पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपची विजयाची हॅट्ट्रिक होणार का?

पुणे : विनायक कुलकर्णी
सन २०१४ आणि सन २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघात विजय संपादन केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजयाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी भाजपने महायुतीच्या मदतीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याखेरीज अन्य उमेदवार रिंगणात उतरले असले तरी मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये होणार आहे.

निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यावर उमेदवारीसाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले पण प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजीची निर्माण झालेली भावना हळूहळू दूर झाली आणि निवडणुकीचे चित्र महायुती आणि आघाडीमधे स्पष्ट झाले.आता निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली आहे. पदयात्रा, मेळावे, जाहीर सभा आणि त्यामध्ये करण्यात येणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे निवडणुकीचे वातावरण रंगत आहे. गेल्या काही वर्षांत पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील, उपनगरातील समस्या वाढताना दिसत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत काही प्रमाणात समस्या कमी झाल्या तरी त्या पूर्णपणे सुटल्या नाहीत, हे वास्तव आहे. असे असले तरी आजवर पुणेकरांनी प्रत्येक राजकीय पक्षाला लोकसभेत जाण्याची संधी दिली आहे.

सन १४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अनिल शिरोळे हे शहराच्या सर्व भागातून मताधिक्य घेऊन काँग्रेसच्या विश्वजित कदमांना पराभूत करून तीन लाख पंधरा हजारांच्या मताधिक्याने निवडून आले तर सन २०१९ ला भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यातील मतांचा फरक तीन लाख पंचवीस हजारांवर पोचला. भाजपची गेली दहा वर्षे अशाप्रकारे शहरात घोडदौड सुरू असताना मागील वर्षी झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा तीस वर्षांचा बालेकिल्ला काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातून हिसकावून घेतला. यामुळे या निवडणुकीत पुणेकर मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
मध्यवर्ती पुण्याचा भाग असलेल्या कसबा शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघांपेक्षा उपनगरांचा समावेश असलेल्या वडगाव शेरी, कोथरूड आणि पर्वती या तीन मतदारसंघांमधील मतदारांची संख्या कितीतरी अधिक आहे आणि त्यामुळे उपनगरांमधल्या मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघावर बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे शहराच्या विस्ताराचा वेग अधिक असला तरी त्या तुलनेत विकासाच्या कामांचा वेग साधला गेला नाही असे म्हणावेसे वाटते. वाहतुकीचा प्रश्न, पुरेसा पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असे अनेक प्रश्न पूर्णपणे सुटले असे नाही. त्यातुलनेत मेट्रो प्रकल्पामुळे शहराचा चेहरा बदलण्यास नक्कीच मदत झाली असे म्हणता येईल. त्यामुळे विकासाच्या वेगाला प्राधान्य देण्याची मानसिकता अधिक प्रमाणात जोर धरेल असे दिसते.

यावेळच्या निवडणुकीत बदलत्या राजकीय परिस्थितीचा लाभ महायुती की महाविकास आघाडीला मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या आणि प्रचाराच्या उर्वरित कालावधीत होणा-या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या जाहीर सभांमुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे त्यामुळे येत्या दि. १३ मे रोजी होणा-या मतदानात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचा भर असणार आहे आणि तीच एका अर्थाने विजयाची नांदी ठरणार आहे असे गणित मांडले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR