31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसोलापूरइयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात

इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात

सोलापूर: दरवर्षी पहिल्यांदा बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. पण, यंदा दोन्ही वर्गांचे निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर होतील, असे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता दहावी व बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत. या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रत्येक केंद्राची तपासणी केली जाणार आहे. त्याठिकाणी असलेले सध्याचे सीसीटीव्ही चालू आहेत का, त्याला बैंकअप (डीव्हीआर) आहे का, याची पडताळणी होईल. परीक्षेच्या ज्या केंद्र शाळा बोर्डाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसवणार नाहीत, तेथर्थाल केंद्राची मान्यता रद्द केली जाणार आहे.

‘सीबीएसई’ बोर्डाच्या बदलावर राज्य बोर्डाचा बदल अवलंबून असल्याची आजवरील स्थिती आहे. सीबीएसई बोडनि दहावीच्या परीक्षेसाठी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ची पद्धत सुरु केली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही हा फॉर्म्युला अवलंबला. आता ‘ओपन बूक’ ही परीक्षा पद्धती अवलंबण्याची ‘सीबीएसई’ बोर्डाची तयारी सुरु आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने पुणे बोर्ड देखील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेईल. या पद्धतीत मुलांना परीक्षेवेळी पुस्तकात पाहून उत्तरे लिहिण्यास मुभा असते.

पण, प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवून विद्यार्थ्यांना पुस्तकात सहजपणे उत्तरे सापडतील असे प्रश्न नसतात. या पद्धतीमुळे कॉपी करण्याच्या गैरप्रकाराला कायमस्वरूपी आळा बसेल, असा विश्वास त्या निणर्यामागे असणार आहे. तर दुसरीकडे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर त्यावेळी दोन्ही वर्गाच्या परीक्षांचे स्वरूप बदललेले असणार आहे. सेमिस्टर पद्धतीने त्यावेळी परीक्षा होवू शकतात, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. तुर्तास आणखी काही वर्षे प्रचलित पद्धतीनुसारच बोर्डाच्या परीक्षा होतील.

इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही वर्गाच्या सर्वच विषयांच्या जवळपास ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण यापूर्वीच शाळांनी ऑनलाइन पद्धतीने बोर्डाला पाठविले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होतील, त्यादृष्टीने बोर्डाची तयारी सुरु आहे. दुसरीकडे जुलैपासून सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाहीत याची विशेष मोहीम घेऊन खात्री केली जाणार आहे. बोर्डाचे अधिकारी प्रत्येक केंद्राला भेटी देतील आणि तेथील स्थितीचा अहवाल बोर्डाला सादर करतील. असे पुणे बोर्ड सचिव औंदुंबर उकिरडे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR