रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण
माजी मंत्री दिलीपराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या यशस्वी प्रयत्नातून दि. १५ मार्च २०२४ रोजी शुभारंभ झालेला रेणापूर येथील जणावरांचा बाजार येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून नव्या दमाने सुरू झाला आहे.
रेणापूर येथील जनावरांचा बाजार मराठवाडयात प्रसिद्ध होता. परंतु बाजारात व्यापारी शेतकरी यांच्यासाठी आवश्यक असणा-या सोयीसुविधा नसल्याने हा बाजार मोडकळीस येण्याच्या मार्गावर होता. जनावरांच्या बाजाराचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती व संचालक मंडळाने जनावरांच्या बाजारासाठी आवश्यक असणा-या सुविधा देण्यासह तयारी करून दि १५ मार्च पासून पुर्वी भरत असलेल्या ठिकाणीच जनावरांच्या बाजारांचा शुभारंभ सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अॅड. शेषेराव हाके पाटील सहाय्यक उपनिबंधक आर जी गडेकर व संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सुरुवातीला दोन तीन बाजाराला म्हणावा तसा शेतकरी , व्यापारी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र बाजार समितीकडून जनावरांच्या पाण्याची व्यवस्था यासह आदी सुविधा मिळत असल्याने जनावरांच्या बाजारात परिसरातील शेतकरी व व्यापारी दूरदूर वरून येत आहेत.