मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे सरकारमध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दुराग्रहामुळे मुंबई मेट्रोच्या कारशेडचे काम रखडले व त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे, सर्वसामान्य मुंबईकरांचे १० हजार कोटींचे नुकसान झाले. सत्ता असताना महापालिकेच्या कामांमध्ये त्यांनी थेट ढवळाढवळ सुरू होती त्यामुळेच या सर्व पुलांचे बांधकाम रखडलेले आहेत, असा आरोप शिवसेना (शिंदे) सचिव तथा प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
डिलाईल रोड येथील पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी आदित्य ठाकरे यांनी सुरू केली. काम पूर्ण झालेले असतानाही सरकार वेळकाढूपणा करून लोकांचे हाल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या वरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आदित्य ठाकरेंच्या या आरोपाला उत्तर देताना, अपूर्ण स्थितीत असलेल्या पुलाचे लोकार्पण करून त्यांना जनतेचा जीव धोक्यात घालायचा आहे का? असा सवाल आ. मनीषा कायंदे यांनी केला. ज्या वरळी विधान मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात, येथे आजवर कार्यालय थाटले नाही मात्र जनतेचा कैवारी असल्याचा कांगावा करीत आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी तथ्यहिन आरोप करीत आहेत, अशी टीका कायंदे यांनी केली. महापालिकेत सत्ता असताना आदित्य ठाकरे महापालिकेच्या कामांत ढवळाढवळ करीत होते. त्यांनी मुंबईतील पुलांची कामे थांबवली होती, असा आरोपही त्यांनी केला.