नायगाव : प्रतिनिधी
पाकिस्तानी व्हॉटस्पऍपच्या ग्रुपवरून भारतातील हिंदुत्ववादी नेत्यासह इतरांना जीवे मारण्याची धमकी देणे आणि परदेशातून शस्त्रे मागण्याच्या चॅटिंग प्रकरणात सुरत पोलिसांनी नरसी येथील एका तरूणास उचलले होते. सुरत पोलिसांनी त्या तरूणास शनिवारी दि. १८ मे रोजी सकाळी परत नरसी येथे आणले. यानंतर कुंचेली शिवारात दोन तास चौकशी करून दुपारी चार वाजताच्या पथक पुन्हा सुरतला रवाना झाले. या पथकासोबत दहशत विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली.
पाकिस्तानातील व्हाट्सऍप ग्रुपवर भारतातील काही हिंदुत्ववादी नेते व पत्रकारांना मारण्याची धमकी देणे, परदेशातून शस्त्रे आयात करण्याच्या प्रकरणात सुरत पोलिस ठाण्यात विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर सुरत पोलिसांनी केलेल्या तपासात व्हाट्सऍपवर झालेल्या चँटींगमध्ये नरसी येथील तरुणाचा सहभाग असल्याच्या संशयावरून दि. १२ मे रोजी नरसी येथील शेख शकील शेख सत्तार वय २० याची झाडाझडती घेतल्यानंतर सुरतला नेले होते. या घटनेनंतर नरसीसह जिल्हयात मोठी खळबळ उडाली होती. मागच्या सहा दिवसांत पाकिस्तान कनेक्शनची चर्चा कमी होत असतानाच सहा दिवसानंतर सुरत पोलीसांचे पथक आरोपीसह परत दि. १८ रोजी नरसीला धडकले. सोबत नांदेड येथील दहशत विरोधी पथकाचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी होते.
स्थानिक पोलिसांना ठराविक अंतरावर ठेवले
नरसीला आल्यानंतर पोलिस चौकीत थांबल्यावर हे पथक शेख शकील यास आजोळी कुंचेली येथे घेऊन गेले. तेथील एका शेतात थांबून दोन ते अडीच तास चौकशी केली प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने यावेळी स्थानिक पोलिसांना सुध्दा ठराविक अंतरावर ठेवले होते. कुंचेली येथून परत नरसी आले आरोपीच्या घरीही गेले तेथे अर्धा तास थांबल्यानंतर पुन्हा नांदेड मार्गे सुरतकडे रवाना झाले. दोन वेळा सुरत पोलिस नरसी येथे आले आणि कुंचेली येथे जाऊन शेतात दोन तास चौकशी केली परत आले आणि गेले त्यामुळे काहीतरी विपरीत घडले असल्याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. दरम्यान जाताना सुरत पोलिसांनी आरोपी शेख शकील याच्या भावाचा मोबाईल घेऊन गेले असल्याचे बोलल्या जात आहे.