फुलंब्री : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी आता तयारीला लागला आहे. खरीप हंगामात लागवड करण्यासाठी बियाणे व रासायनिक खते शेतक-यांना योग्य दरात गुणवत्तापूर्वक बियाणे मिळावे, यासाठी भरारी पथकामार्फत कृषी विभागाची करडी नजर असणार आहे. खते व बियाणांची जास्तीच्या दराने विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी दिली आहे.
तालुक्यामध्ये ९३ गावे असून कृषी सेवा केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बाजारपेठेच्या गावात कृषी सेवा केंद्रांची संख्या जास्त असल्याने शेतक-यांना तालुक्याच्या ठिकाणी कमी प्रमाणात यावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागांत असणा-या कृषी सेवा केंद्रातून जास्तीच्या दराने रासायनिक खते व बियाण्याची शेतक-यांना विक्री केली जाते, अशा तक्रारी कृषी विभागाकडे सातत्याने खरीप हंगामात येत असतात. कृषी सेवा केंद्र चालकाने सरकारने निर्धारित केलेल्या किमतींत गुणवत्तापूर्वक बियाणे शेतक-यांना विक्री करावे. निर्धारित केलेल्या किमतींपेक्षा जास्त दराने खते व बियाण्याची विक्री केल्यास कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून भरारी पथक तैनात करण्यात आले असून, या भरारी पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी भारत कासार असून, सचिव म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी राम बेंबरे आहेत.
दोषींवर दंडात्मक कारवाई
कृषी सेवा केंद्र चालकांनी जास्तीच्या दरात रासायनिक खते व बियाणे शेतक-यांना विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती एखाद्या कृषी सेवा केंद्र चालक दोषी आढळल्यास अशा कृषी सेवा केंद्र चालकावर दंडात्मक कारवाई कृषी विभागाचे भरारी पथक करणार आहे.