नागपूर : मागील काही दिवसापासून छगन भुजबळ आणि मनोज जरंगे यांच्यातील तणाव वाढला आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काही ठिकाणी भुजबळ यांचे पुतळेही जाळण्यात आले आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणासाठी भुजबळांसहित ओबीसी नेते विरोध करत आहेत. दरम्यान, ओबीसी आणि मराठा समाजाचे महाराष्ट्रात प्रगतीत मोठे योगदान आहे. या दोन समाजात कुटुता निर्माण होणे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे समाजातील कटुता टाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे मत वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
ओबीसी आणि मराठा या दोन समाजात कुटुता निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी दोघांचीही आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा व ओबीसींचे हक्काचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा शब्द दिला आहे. त्यावर सर्वांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे. परंतु त्याबाबत साशंकता निर्माण करून दररोज नवीन बाबी समोर आणणे अयोग्य आहे. मराठा, ओबीसी एकत्र आले नाहीत तर कुटुता वाढत जाईल. ते महाराष्ट्राच्या प्रगतीला बाधक ठरेल, असे ते म्हणाले.