पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर गेले दहा दिवस चंद्रकांत वाघमोडे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा रविवारी अकरावा दिवस आहे. मात्र या आंदोलनाची दखल कोणत्याही लोकप्रतिनीधीने न घेतल्यामुळे आंदोलनाची दिशा बदलण्यात आली आणि राज्यातील आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजाने ठिय्या आंदोलन केले.
तब्बल दिड तास चाललेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतून ठप्प झाली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिसांकडून सहयोग सोसायटी आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी काही काळ बारामती भिगवन रस्त्यावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. तर प्रशासकीय भावना समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पुणे ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट दिली. तर शनिवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भेट दिली होती.