नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थमंत्रालयाने बँकांबाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. सायबर गुन्ह्यांपासून (सायबर सुरक्षा) संरक्षण करण्यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यूसीओ बँकेतील अलीकडील घटना लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या डिजिटल ऑपरेशन्सशी संबंधित प्रणाली आणि प्रक्रियांचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे.
मंत्रालयाने बँकांना त्यांच्या सायबर सुरक्षेची तपासणी आणि ती मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. बँकांनी बारीक लक्ष ठेवले पाहिजे. भविष्यातील सायबर धोक्यांसाठी तयार राहावे, असे सूत्रांनी सांगितले. वित्तीय क्षेत्रातील वाढत्या डिजिटलायझेशनमुळे वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक नियमित अंतराने बँकांना याबद्दल जागरूक करत आहेत. गेल्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील यूसीओ बँकेत तात्काळ पेमेंट सेवेद्वारे काही लोकांच्या खात्यात ८२० कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित करण्यात आले. यापैकी ६४९ कोटी रुपये वसूल केले आहेत. चुकीच्या पद्धतीने पाठवलेल्या एकूण रकमेच्या हे प्रमाण ७९ टक्के आहे. मात्र, ही तांत्रिक चूक मानवी चुकांमुळे झाली की हॅकिंगच्या प्रयत्नामुळे झाली, हे युको बँकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
बँकेच्या चुकीमुळे घडला होता प्रकार
युको बँकेतील काही खातेदारांच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाल्याची घटना घडली होती. प्रत्यक्षात बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडली होती. बँकेला आपली चूक लक्षात येताच त्यांनी पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू केली.