13.6 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीत ठिणगी?

महायुतीत ठिणगी?

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेच्या या उदारमतवादी धोरणाचे भाजपनेही स्वागत केले. त्यानंतर महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरले. त्यामुळे मनसे महायुतीचा घटक असल्याचे बोलले जाते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विधानपरिषद निवडणुकांवरून महायुतीत खटके उडत असल्याचे दिसून आले. कारण मनसेने विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. पण भाजपनेही ती जागा आमची हक्काची असल्याचे म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटानेही मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये सध्या विधानपरिषदेच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

यापैकी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेने अभिजीत पानसे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. हिंदुत्त्वासाठी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांत बिनशर्त पाठिंबा देऊन आमचा पक्ष चालणार आहे का, असा सवाल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. मात्र, याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. कोकणातील पदवीधर मतदारसंघाची जागा आमची हक्काची आहे. निरंजन डावखरेंची ही जागा भाजपची सिटिंग जागा आहे. त्यामुळे आम्ही विधानपरिषदेची निवडणूक लढणार आहोत. मनसेला आमच्या शुभेच्छा.. असे म्हणत भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.

पानसेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मनसेचे अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, मनसेच्या अभिजीत पानसे यांना एकनाथ शिंदे पाठिंबा देणार का, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

नलावडे यांच्या नावाची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नलावडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR