कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपत असताना बंगालमधील नादिया जिल्ह्यात हिंसाचाराची मोठी घटना घडली. नादिया शहरात एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हफिजुल शेख असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी एकापाठोपाठ दोन गोळ्या हफिजुलवर झाडल्या, त्यातील एक गोळी हाफिजुलला लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
हफीझुलने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी हाफिजुलच्या नेतृत्वाखाली अनेक अल्पसंख्याकांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळातही त्या भागात भाजपची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. त्यामुळे लोकप्रियता वाढल्यामुळेच हाफिजुलची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या हत्येसाठी भाजपने विरोधी पक्षांना जबाबदार धरले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, चहाच्या हॉटेलजवळ शनिवारी रात्री हफिझुल शेखची हत्या करण्यात आली. मारेक-यांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली होती. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मारेकरी आणि पीडित दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, या दोघांवरही गुन्हे नोंद आहेत. आरोपीची ओळख पटली असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.