लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी पावसाने हजेरी लावली. बुधवारी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सूमारास लातूर शहरात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडला. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. शहरातील संपुर्ण रस्ते जलमय झाले होते.
लातूर जिल्हा व परिसरातील हवामानात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अचानक बदल झाला. उन्हाच्या चटक्यासह पावसाचा सडाकाही पडत राहिला. बुधवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. ब-याच ठिकाणी चांगला पाऊस पडला तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होता. गुरुवारी पहाटे लातूर शहरात ब-यापैकी पाऊस पडला. सूर्योदय झाल्यानंतर कडक उन्ह राहिले. दुपारपर्यंत उन्हाचा चटका होता. त्यानंतर अनचानक आकाशात ढगांची गर्दी झाली. सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मोठा पाऊस पडला. काही मिनीटाने पाऊस थांबला आणि लगेच आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. यासह पावसालाही सुरुवात झाली. पाऊस इतका जोरदार होता की, रस्त्यावर समोरचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे वाहने जागेवर थांबली. शहरातील सर्वच रस्त्यांनी पाण्याचे लोंढे वाहत होते तर रस्त्याच्या दूतर्फा दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
लातूर शहरात अचानक जोरदार पाऊस सुरु झाल्याने फुटपाटवरील छोट्या व्यापा-यांची तारांबळ उडाली. अनेकांचे साहित्य भिजून नुकसान झाले. गंजगोलाईतील भाजी मंडईतही पावसाने नुकसान झाले. अमावस्येमुळे लातूरचा आडत बाजारात गुरुवारी बंद होता. त्यामुळे अचालक आलेल्या मोठ्या पावसामुळे आडत बाजारात नुकसान झाले नाही. वादळी वा-यामुळे झाडं हेलकावे देत होती. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटाने भितीदायक वातावरण बनले होते.