कटरा : वृत्तसंस्था
एकीकडे राजधानी दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सोहळा सुरू असताना दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. यानंतर बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या घटनेत १२ भाविकांचा मृत्यू झाला असून, ५७ जखमी झाले आहेत.
भारतीय लष्कर, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधात मोहीम सुरू केली आहे. ही घटना जम्मू-काश्मीरमधील रियासी भागात घडली आहे. शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते. बस जंगल परिसरात पोहोचताच दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला.
दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे घाबरलेल्या बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पडली. बसमध्ये जवळपास ५० भाविक असल्याची माहिती मिळत आहे. ज्या दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला, ते सर्व राजौरी, पूंछ आणि रियासी भागात लपून बसले असून, सुरक्षा दलाने त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.