लातूर : सिध्देश्वर दाताळ
जिल्ह्यातील शाळा सुरु होण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने शालेय साहित्य खरेदीकडे पालक वळले आहेत. त्यामुळे बाजारपेठ गजबजली आहे. शालेय साहित्याच्या दरात यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. शहरातील पुस्तकांच्या दुकानात पालकांसह चिमुकल्या विद्यार्थांची गर्दी पहावयास मिळत आहे. गेल्या आठ दिवसापासून शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरु झाली आहे.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे जिवाचा आटापिटा करुन पोटाला चिमटा देवून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देणा-या पालकांची संख्या कमी नाही. मात्र शैक्षणिक साहित्यातील वाढत्या किमती पालकांना परवडणा-या नसल्या तरी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पालकांना वाढत्या किमतीचा बोजा सहन करावा लागत आहे. गतवर्षी १०० पानी वही १० ते १५ रूपयांना मिळत असे मात्र तीच वही यंदा २० ते २५ रूपयांना पालकांना खरेदी करावी लागत आहे. तसेच २०० पानी वही २५ रूपयांना होती ती आता ३० रूपयांना झाली आहे. यात वह्याच्या किमती मात्र कंपनीनुसार वेगवेगळ्या असल्याचे व्यापा-यांनी सागीतले. गतवर्षाच्या तूलनेत यंदा वह्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
त्याचबरोबर रजिस्टर, कंपास पेटी, पेन, पॅड यांच्याही किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पालकांना आर्थीक बोजा सहन करावा लागत आहे. शहरातील बाजारपेठेत असलेल्या नामवंत दुकानात शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थीसह पालकांची लगबग सुरू झालेली पाहवयास मिळत आहे. पालकांकडून विविध विषयांची पुस्तके, गाईडस, बुक्स यासोबतच दफ्तर, जेवणाचे आकर्षक डब्बे, पाणी बॉटल यासह विविध साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहेत.
गतवर्षाच्या तूलनेत यंदा वह्यांच्या किमतीत वाढ झाल्याने पालक आपल्या पाल्यास आवश्क तूवढ्याच वह्या खरेदी करीत आहेत. यात एक रेगी, दोन रेगी, चार रेगी, चौकटी याही प्रकारच्या वह्या बाजारात विक्रीस आहेत. तसेच, २०० पेजेस वह्या ३५० ते ४०० रूपये पर्यत, २०० पेजेस रजिस्टर ४०० ते ६०० रूपये पर्यत, १०० पेजेस रजिस्टर २२५ ते २५० रूपये पर्यत, स्काय बॅग १५०० ते ३००० रूपयांपर्यत, पाणी बॉटल १०० ते ९०० रूपयांपर्यत, स्वाध्याय पुुस्तिका ३० ते २५० रूपयांपर्यत, शालेय दफ्तर २५० ते १८०० रूपयांपर्यत बाजारपेठेत शालेय साहित्य विक्री केली जात आहे. स्कूल बॅग, टिफिन, छत्री, पाण्याची बाटली अशा सगळयाच साहित्यासाठी उत्साह आहे. शहरातील काही शाळा या वस्तू देतात तर अनेक शाळा बाजारातून शालेय साहित्य खरेदी करा, असे पालकांना सांगतात. त्यामुळे बाजारात शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी सध्या गर्दी वाढू लागली आहे.