24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरसुधाकर शृंगारे  यांच्या पराभवास लातूर जिल्ह्यातील भाजप नेते जबाबदार

सुधाकर शृंगारे  यांच्या पराभवास लातूर जिल्ह्यातील भाजप नेते जबाबदार

लातूर : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर राखीव लोकसभा मतदार संघातून भाजपने उमेवारी दिलेले सुधाकर शृंगारे यांच्या पराभवास लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते जबाबदार असल्याचा आरोप करुन भारतीय दलित पँथर्सचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजयभाऊ कांबळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने माजी खासदार सुधाकर शृंगारे  यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी पत्रकारांशी बोलताना केली.
मागच्या पाच वर्षाच्या आपल्या खासदारकीच्या काळात सुधाकर शृंगारे  यांनी लातूर लोकसभा मतदार संघाच्या विकासात मौलिक योगदान दिलेले आहे. त्यांनी मतदार संघातील सर्वच समाजाच्या लोकांना सोबत घेऊन ख-या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे नमुद करुन संजयभाऊ कांबळे पुढे म्हणाले की, सुधाकर शृंगारे  यां या मतदार संघातून चक्क उमेदवारीच  मिळू नये, यासाठीही भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोपही कांबळे यांनी केला. या वेळी शृंगारे यांचा विजय झाला असता तर ते नक्कीच मंत्री झाले असते. मात्र, त्यांना मंत्रिपदापर्यंत पोहोचूच द्यायचे नाही, या उद्देशाने भाजप नेत्यांनी शृंगारे यांच्या पराभवाचा पाया रचल्याचा आरोप कांबळे यांनी केला. तसेच लातूर जिल्ह्यात बौद्ध समाजाचा एक नेता राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहे, आता शृंगारे यांच्या रुपाने या समाजाचा मंत्री नको, या भावनेनेही भाजप नेत्यांनी शृंगारे  यांना  विजयापासून रोखल्याचे त्यांनी  बोलून दाखविले. शृंगारेच्या पराभवास भाजपचे कोणते नेते जबाबदार आहेत? असे विचारले असता त्यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांसह जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते जबाबदार असल्याचे सांगितले.
शृंगारे यांच्या पराभवामुळे बौद्ध समाज पुन्हा भाजपपासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  मागच्या सात वर्षाच्या काळात जिल्ह्यातील भाजपाला आर्थिक पाठबळ देण्यासह पक्ष संघटन वृद्धीसाठी शृंगारे यांनी जेवढे योगदान दिले आहे, तेवढे अन्य कोणत्याही भाजप नेत्याने दिले नसल्याचे कांबळे यांनी बोलून दाखविले. एवढे सगळे करणा-या नेत्यालाच स्वपक्षाचे नेतेच जर विश्वासघात करुन पराभूत करत असतील तर विश्वासाची अपेक्षा करायची तरी कोणाकडून ? अशी भावना कांबळे यांनी व्यक्त्त केली.
यावेळी प्रा. बालाजी आचार्य, अ‍ॅड. सुभाष सोनकांबळे, मयूर कांबळे, संजय सोनकांबळे, धम्मानंद घोडके, महेंद्र आचार्य, सुनील क्षीरसागर, निवृत्ती भातकुळे, सतीश वाघमारे, नामदेव बामणे, सतीश मादळे, अरविंद सोनकांबळे, राजकुमार घाडगे, नाना घाडगे, विलास वाघमारे, बबन वाघमारे, चेतन महालिंगे, धम्मपाल सावंत, कैलास क्षीरसागर, गोविंद गायकवाड, अमोल शृंगारे  यांच्यासह बौद्ध
समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR