मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणा-या यावर्षीच्या एमएच सीईटीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. अभियांत्रिकीच्या एका प्रश्नपत्रिकेत ५४ चुका आढळल्या. त्यामुळे फेरपरीक्षा न घेता सीईटी परीक्षेत पारदर्शकता आणावी. तसेच यावर्षी झालेल्या गोंधळाची चौकशी करून सीईटी कक्षाच्या आयुक्तांना निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्यात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आमचे सरकार आल्यास सीईटी परीक्षेसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल, असेही त्यांनी जाहीर केले.
नीट पाठोपाठ राज्य सीईटी परीक्षेत घोळ झाल्याच्या तक्रारी आहेत. राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. त्यामुळे या परीक्षा प्रक्रियेवर संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एममएचटी-सीईटीमधील पर्सेंटाईल पद्धत बंद करून गुणांवर आधारीत गुणवत्ता यादी असावी, अशी मागणी केली. यावेळी ठाकरे यांनी सीईटी परीक्षेत झालेल्या घोळाची माहिती दिली.
सीईटी अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांनी ५४ चुका काढल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी प्रश्नपत्रिका तयार केली त्यांच्या योग्यतेची परीक्षा घ्यायला पाहिजे. भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत उत्तराचे पर्याय योग्य नव्हते. याशिवाय परीक्षेत १ हजार ४२५ हरकती नोंदविण्यात आल्या. अशी हरकत नोंदवताना विद्यार्थ्यांकडून १ हजार रुपये घेतले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त चुका करून सीईटी कक्षाला जास्त पैसे मिळावेत म्हणून हा घोटाळा केला जात आहे काय? प्रश्नपत्रिकेतील ५४ चुका लक्षात घेता ही प्रश्नपत्रिका निवडणूक आयोगाने तयार केली काय? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.
यावर्षीच्या परीक्षेत पारदर्शकता नव्हती. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिल्या नाहीत. त्यामुळे सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करावेत. तसेच यासंदर्भत राज्य सरकारकडून काहीच अपेक्षा नसल्याने सीईटी प्रकरणात आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.