गुवाहाटी : पूर्वी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांना सांगितले की, समुदायांमधील तीव्र ध्रुवीकरणामुळे ईशान्येकडील राज्यात तुरळक हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. मणिपूर समस्येवर राजकीय तोडगा निघायला हवा. मणिपूरमधील ही एक राजकीय समस्या आहे जिथे कुकी आणि मीतेई समुदायाचे लोक एकमेकांशी भांडत आहेत. अशा परिस्थितीत मणिपूरच्या समस्येवर राजकीय तोडगा काढणे आवश्यक आहे. लुटलेली ४ हजारांहून अधिक हत्यारे अजूनही लोकांच्या हातात असून ही शस्त्रे हिंसाचाराच्या घटनांमध्ये वापरली जात आहेत.
सुरक्षा कर्मचारी आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येच्या निषेधार्थ मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात ४८ तासांच्या बंद दरम्यान त्यांची ही टिप्पणी आली आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यात भारतीय राखीव बटालियनचा एक जवान आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला. यानंतरच, बंदची हाक देणाऱ्या आदिवासी एकता समितीने पीडित कुकी समाजातील असल्याचे म्हटले आहे आणि खोऱ्यातील बंडखोर गटांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
बंददरम्यान बाजारपेठा बंद राहिल्या आणि वाहने रस्त्यांवर थांबली. सरकारी कार्यालयात कर्मचारी कमी आले आणि शैक्षणिक संस्थांमध्येही उपस्थिती कमी होती. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राज्यातील पोलिसांवर घात घालून हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अतिरेक्यांनी मणिपूर पोलिस कमांडोच्या पथकावर हल्ला केला होता.