पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी विवाहितेचा गरोदरपणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली आहे. यासोबतच बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून १६ वर्षीय मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी पोलिसांनी तिचे आई-वडील, सासू-सास-यांसह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांच्या मते, मोखाडा तालुक्यातील एका गावात राहणा-या कातकरी समाजातील तरुणीचे जव्हार तालुक्यातील नेहाळे येथील २१ वर्षीय तरुणाशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान ती गरोदर राहिली असता तिच्या कुटुंबीयांनी गेल्या २९ मार्च रोजी तिचे लग्न जयेशसोबत लावले होते. लग्नाअगोदर गरोदर असलेल्या या अल्पवयीन मुलीचा ६ जून रोजी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भधारणेशी संबंधित आजारामुळे मृत्यू झाला. यावेळी ती साधारण पाच ते सहा महिन्यांची गरोदर होती. सुरुवातीला तिच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या तपासानंतर, २२ जून रोजी पोलिसांनी १० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला.
पोलिसांनी सुमोटो गुन्हा केला नोंद
या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीचे आणि तिच्या पतीचे आई-वडील, मुलीचा मेहुणा, लग्नाशी संबंधित डेकोरेटर, केटरर आणि भटजी अशा १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) एन (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे) आणि ३४ (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ च्या कलम ९, १० आणि ११ नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी पतीला अटक केले असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.