जळगाव : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात जाहीर केली आहे. राज्याचा प्रमुख बोलत असतो, त्यावेळी त्यात तथ्य असते. मात्र या गोष्टीला सबुरीने घ्यायला हवे. सरकार हे कोणाचाही रोष न येता मार्ग काढून आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनी थोडे शांततेने घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी मराठा कार्यकर्त्यांना केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यभरात नेत्यांना गावबंदीसह तीव्र आंदोलन केले जात आहे. अनेक नेत्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न होत आहे. बसेसची तोडफोड केली जात आहे.
यावर गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री अनिल पाटील यांनी मराठा बांधवांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. कोणालाही नाराज न करता टिकणारे आरक्षण पाहिजे असेल तर थोडे संयमाने घ्यायला हवे’, अशा प्रकारची भूमिका मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांनी मांडली आहे.