28.5 C
Latur
Wednesday, October 9, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलन पेटले; छ. संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद

मराठा आंदोलन पेटले; छ. संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मराठवाड्यात तापताना पाहायला मिळत आहे. जालना येथे महिला तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली आहे. तर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तापले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एसटी सेवा रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चारही जिल्ह्यांतील बससेवा देखील बंद करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांत एकूण ३० आगार असून, अंदाजे २८०० पेक्षा अधिक फे-या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचा परिवहन विभागाला फटका बसताना पाहायला मिळत आहे. नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे आयजी महावरकर आणि हिंगोलीच्या पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या सूचनेनुसार एसटी विभागाने बसफे-या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांतील एकूण ७ आगारांतील ३८० बसेसच्या २८०० फे-या आज रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास ३५० बसेस जागेवर उभ्या आहेत. तसेच, आज सायंकाळी पाचनंतर उद्या बस सुरू करायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

तहसीलदारांची गाडी फोडली…
जालना येथील आंदोलक देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. तहसीलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे. जालन्यातील रामनगर येथील ही घटना असल्याचे समोर येत आहे. बाजीउम्रद येथील मोबाईल टॉवरवर चढलेलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ही गाडी फोडण्यात आली आहे. तहसीलदार यांनी चर्चेसाठी गावात येण्याची गावक-यांची मागणी होती. त्यानंतर रामनगर येथे आंदोलकांकडून रास्ता रोको देखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आंदोलनस्थळा जवळून जाणा-या तहसीलदारांची गाडी अडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR