24.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeसंपादकीयराहुल सत्यच बोलले!

राहुल सत्यच बोलले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस आणि राहुल गांधी या नावाची अ‍ॅलर्जी आहे यात शंका नाही. कारण या दोघांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या निमित्ताने ते दिसून आले. सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून सभागृहात सत्तारूढ भाजपवर जोरदार हल्ला चढविला. राहुल यांनी हिंदू आणि हिंसा यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोदी आणि त्यांच्यात चकमक उडाली. हिंदुत्व म्हणजे भीती, तिरस्कार आणि अपप्रचार पसरविणे नव्हे. जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसाचार आणि तिरस्कारात गुंतलेले असतात. सर्व धर्म आणि आपल्या महान नेत्यांनी अहिंसा आणि निर्भयतेबद्दल भाष्य केले आहे. परंतु जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते केवळ हिंसा आणि तिरस्काराबद्दल बोलतात. तुम्ही हिंदूच नाही, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल यांच्या या वक्तव्याला पंतप्रधान मोदींसह सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावर आपण भाजपबद्दल बोलत आहोत.

भाजप, रा. स्व. संघ किंवा मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे असे राहुल गांधी म्हणाले. निर्भयतेचे महत्त्व अधोरेखित करताना गांधी यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि शीख समाज धैर्याबद्दल सांगतो असे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँगे्रसवर सडकून टीका केली. राहुल गांधी बालबुद्धीचे असल्याची खिल्लीही त्यांनी उडविली. हिंदू आणि हिंसाचार यांचा राहुल यांनी संबंध जोडला आणि लोकसभेत खोटे दावे केले, असा आरोपही केला. संसदीय लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राहुल यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणीही त्यांनी केली. लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. त्यावर संसदेबाहेर बोलताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या जगातून सत्य काढून टाकता येऊ शकते, वास्तवातून नाही! आपल्या भाषणाचा काही भाग वगळल्याबद्दल राहुल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले असून आपण विचारपूर्वक केलेले भाष्य सभागृहाच्या कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकणे हे संसदीय लोकशाही सिद्धांताच्या विरुद्ध आहे.

त्यामुळे ते भाष्य कामकाजाच्या नोंदीमध्ये पुन्हा समाविष्ट करावे असे म्हटले आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा वा कोणताही धर्म न पाळता निधर्मी राहण्याचा मूलभूत अधिकार संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. मात्र, चंद्रावर झेप घेणा-या भारतात आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्माच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण करणारे राजकीय पक्ष आहेत हे दुर्दैवच म्हटले पाहिजे. केवळ भाजपला मत देऊन नरेंद्र मोदी यांना कायम सत्तेत ठेवणे म्हणजे खरे हिंदुत्व, अशी हिंदुत्वाची नवी परिभाषा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत भाजपने तयार केली होती. हिंदुत्वाबद्दलच्या भाजपच्या या व्याख्येबद्दल देशपातळीवर व्यापक चर्चा होणे आवश्यक होते. राहुल गांधी यांचे हा मुद्दा छेडणारे आक्रमक भाषण देशभरात चर्चेचा विषय बनले आणि त्यातून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या वैचारिक भूमिकांची तुलना सुरू झाली. हे कधीतरी होणे आवश्यकच होते.

‘जय संविधान’ असे म्हणत भाषणाची सुरुवात करताना राहुल यांनी सत्ताधारी भाजप तसेच त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केल्याने दहा वर्षांत पहिल्यांदाच मोदींचे मंत्रिमंडळ हादरले. तिस-यांदा पंतप्रधानपद भूषविणा-या मोदींना पुढील वाटचाल सोपी जाणार नाही याची जाणीव झाली असावी. जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते फक्त असत्य बोलतात आणि हिंसा, द्वेष पसरवतात. त्यामुळे तुम्ही हिंदू नाहीच असा घणाघात राहुल यांनी केला. हा घाव जिव्हारी लागल्याने गृहमंत्री अमित शहा आणि अन्य मंत्र्यांनी राहुल यांच्या भाषणात वारंवार अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मुद्दे संपले की माणूस गुद्यावर येतो तसेच काहीसे झाले. हिंदू म्हणजे केवळ नरेंद्र मोदी, भाजप किंवा रा. स्व. संघ नव्हे हे ठामपणे सांगणा-या राहुल गांधी यांना अडवणे भाजपला अवघड गेले. राहुल गांधी यांना उत्तर देताना संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे हे गंभीर आहे अशी टीका मोदी यांनी केली. भाजपच्या सोशल मीडियाने तेच वाक्य उचलत राहुल गांधी समस्त हिंदू समाजाला हिंसक म्हणत असल्याचे नरेटिव्ह चालवण्यास सुरुवात केली. भाजप कार्यकर्त्यांनी दिवसभर राहुल गांधी यांच्या निषेधाचे कार्यक्रम केले.

गत दहा वर्षांत सोशल मीडियावर आपल्या सोयीचे नरेटिव्ह चालवण्याचे जे उद्योग भाजपने केले तेच आता बूमरँगसारखे त्यांच्यावरच उलटल्याचे दिसून आले. अनपेक्षितपणे वातावरण आपल्या विरोधात जाऊ लागल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. अग्निवीर योजना, मणिपूरमधील हिंसाचार, महागाई, बेरोजगारी, नोटबंदी, पेपरफुटी, ईडी-सीबीआय यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर राहुल यांनी प्रश्न उपस्थित केल्याने सत्ताधारी पक्षाची गोची झाली आहे. कारण जनतेला या मुद्यांवर उत्तरे द्यावी लागणार आहेत. विरोधी पक्षनेत्याने देशातील ज्वलंत मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला बालिशपणा कसे म्हणणार? मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधींना ‘बालिश’ ठरवणे समर्थनीय तर नाहीच शिवाय पंतप्रधानपदावरील व्यक्तीला शोभा देणारे नाही. राहुल ‘बालिश’ असतील तर त्यांची दखल का घेता? ‘बालिश बहु बडबडले’ असे म्हटले जाते पण इथे तर राहुल सत्यच बोलले, असे म्हणावे लागेल. कारण वर्मी घाव बसल्यानेच मोदींना मुद्यावरून गुद्यावर उतरावे लागलेले दिसते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR