मुंबई : पाणीटंचाईने वसई-विरारकर त्रस्त आहेत मात्र सूर्या धरणाची १८५ दशलक्ष लिटर पाण्याची योजना पूर्ण तयार होऊनही सत्ताधा-यांच्या वेळेअभावी उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी शुक्रवारी (ता. २७) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिला ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसई-विरार महापालिकेवर एल्गार मोर्चा काढला होता. पाच दिवसांत पाणी मिळाले नाही तर मी स्वत: वसई-विरारकरांसाठी अंगावर पहिली केस घेईन, असा इशारा शर्मिला ठाकरे यांनी महापालिकेला दिला.
वसई-विरारकरांनी काढलेल्या मोर्चाचे महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. मुंबईपासून दीड किलोमीटर अंतरावर असणा-या वसई-विरारला पाणीटंचाई भेडसावत आहे. पाच महिन्यांपूर्वीच सूर्या धरण भरले असल्याचे पालिका म्हणते, पण उद्घाटन कोणी करायचे, या नाट्यात वसईकरांना पाणीबाणीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उद्घाटन कुणीही करा, पण लोकांना पाणी द्या, असे आवाहन शर्मिला ठाकरे यांनी केले.
शर्मिला ठाकरे यांनी महापालिकेला अंतिम इशारा दिला आहे. जर त्यावेळेत पाणी मिळाले नाही तर आठव्या दिवशी आयुक्तांच्या घराचे पाणी बंद करण्यात येईल, तसेच वसई-विरारकरांना सूर्या धरणाचे पाणी चालू करून देऊ.