25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रवृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले आश्वासन

सांगली : वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक असून अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत. त्याचीही घोषणा लवकरच करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी याबाबतची मागणी केली होती, अशी माहिती राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे, माजी राज्य कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर, सरचिटणीस विशाल रासनकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी दिली.

कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रिफ, संभाजी पाटील-निलंगेकर, दिलीप वळसे व विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे संघटनेने अनेकदा पाठपुरावा केला. संभाजीराव निलंगेकर कामगार मंत्री असताना, त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली. या समितीने अहवालही सादर केला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे, अशी शिफारस केली होती. मात्र त्यानंतर चार वर्षे अंमलबजावणी होताना दिसत नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा संजय केळकर यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. केळकर यांनी नुकतीच अधिवेशनातही कल्याणकारी मंडळाची मागणी केली. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ केल्यानंतर या घटकालाही न्याय द्यावा, असा आग्रह धरला. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केळकर यांच्या मागणीबाबत सांगितले की वृत्तपत्र विक्रेत्यांनाही न्याय देऊ, त्यांच्या कल्याणकारी मंडळाचीही घोषणा लवकरच करू.

अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे पाठपुरावा करत आहोत. संजय केळकर यांनी यावेळीही मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्वासन दिले. ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे. केळकर यांच्या माध्यमातून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. लवकरात लवकर मंडळाची घोषणा व्हावी व अंमलबजावणी सुरू व्हावी, अशी मागणी करू, असे राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी व कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR