पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक शासकीय पूजा संपन्न झाली. नाशिकचे घुगे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुराया चरणी साकडे घातले. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणे आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्याने आम्हाला द्यावी, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुराया चरणी घातले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘वारकरी कुठल्याही परिस्थितीत पंढरीच्या दिशेने चालत राहिले, त्यामुळेच कुठलाही कुकर्मा आमचा हा विचार संपवू शकला नाही. महाराष्ट्र धर्म हा वारक-यांनी जिवंत ठेवला. माणसे बदलली तरी श्रद्धा बदललेली नाही, विकास आराखडा आपण केला आहे, आधी मंदिर संवर्धनाचे काम पाहिजे, अशी आपली भूमिका होती. ७५ कोटी रुपयांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आज झाले आहे. पुरातत्व विभागाला मला सांगणं आहे की, कोट्यवधी लोकांच्या भावना यासोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे हे काम उत्तम आणि लवकरात लवकर झाले पाहिजे. पंढरपूर विकास आराखडा हा सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे.’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे
पंढरपूरचं बदललेलं स्वरूप पाहण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होईल. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे, हेच विठुरायाकडे मागणं आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतक-यांवर मोठे संकट आहे. अवर्षणग्रस्त शेतकरी आहेत, शेतक-याला समाधान देण्याची शक्ती विठुरायाने आम्हाला द्यावी. राज्यात आज अनेक समाजाचे प्रश्न आहेत. मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी, आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत. ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये सर्वांसाठी प्रार्थना मागितली, त्याच पद्धतीने विठुराया चरणी मी मागणं मागतो की, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्याने आम्हाला द्यावी.