29.6 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeमहाराष्ट्रप्रक्षोभक भाषणे; नितेश राणेंसह दोन भाजप आमदारांविरोधातील याचिका निकाली

प्रक्षोभक भाषणे; नितेश राणेंसह दोन भाजप आमदारांविरोधातील याचिका निकाली

मुंबई : विविध सभांमध्ये प्रक्षोभक, भडकावू भाषणे करून धार्मिक तेढ निर्माण करू पाहणा-या भाजप आमदार नितेश राणे, गीता जैन, तेलंगणातील टी. राजा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका खंडपीठाने आज निकाली काढली. नितेश राणे, भावना गवळी यांनी धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिल्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढण्याचा निर्णय घेतला.

विविध सभांमध्ये प्रक्षोभक, भडकावू भाषणे करून धार्मिक तेढ निर्माण करू पाहणा-या भाजप आमदार नितेश राणे, गीता जैन, तेलंगणातील टी. राजा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात यावेत, या मागणीसाठी खार येथील शिक्षिका अफताब सिद्दिकी यांच्यासह मिरा रोड, भाईंदर, अंधेरी येथील नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबई आणि मिरा-भाईंदरच्या पोलिस आयुक्तांनी नितेश राणे, गीता जैन यांच्या कथित भडकावू भाषणांच्या ट्रान्सक्रिप्टची छाननी केली. त्यानुसार आरोपींविरुद्ध ‘भादंवि कलम २९५-अ’ लागू होत नसल्याचा निष्कर्ष पोलिस आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसल्याचे दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर येथील काशिमिरा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एका गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच, उर्वरित तीन गुन्ह्यांत पुढील आठ आठवड्यांत आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, आरोपी भाजप आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भडकावू भाषणे देईल. त्यामुळे न्यायालयाने याचिका प्रलंबित ठेवाव्यात, न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत आरोपींनी भडकावू भाषणे केल्यास याचिकाकर्ते पुन्हा कोर्टात येऊ शकतात, असे स्पष्ट केले व याचिका निकाली काढली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR