26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंविधानावर खरचं प्रेम असेल, तर मोदी, गांधींनी मनुस्मृती जाळावी

संविधानावर खरचं प्रेम असेल, तर मोदी, गांधींनी मनुस्मृती जाळावी

प्रकाश आंबेडकरांचे आव्हान!

मुंबई : आणीबाणी जाहीर केलेला दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून सडकून टीका करण्यात आली. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पीएम मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संविधानावर खरोखरच प्रेम असेल, तर मी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना मनुस्मृतीच्या प्रती जाळण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत केली आहे.

आंबेडकर यांनी म्हटले की, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संविधानावर वार केले आहेत. तसेच, वेळोवेळी उपेक्षित, वंचित जाती आणि समाजाचे शोषण केले आहे. बाबासाहेबांचे आदर्श आणि संविधानातील मूल्यांना काँग्रेस आणि भाजपने भ्रष्ट केले असल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते संसदेपर्यंत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कधी पंतप्रधान मोदींना हुकूमशहा म्हटले तर कधी ‘संविधान धोक्यात आहे’ अशा घोषणा दिल्या. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेस आणि इंडियाने आघाडीने संविधान वाचवले आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष संविधान वाचवाचा नारा देत भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत होते. मात्र विरोधकांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देताना भाजपने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अधिसूचना जारी करून २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे.

अधिसूचनेत लिहिले आहे की २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती, त्यावेळच्या सरकारने सत्तेचा प्रचंड गैरवापर करून भारतातील जनतेवर अतिरेक आणि अत्याचार केले होते. भारतातील लोकांचा देशाच्या संविधानावर आणि भारताच्या मजबूत लोकशाहीवर दृढ विश्वास आहे. म्हणून आणीबाणीच्या काळात ज्यांनी लढले आणि सत्तेचा घोर दुरुपयोग केला त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी भारत सरकारने २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे.

सरकारच्या निर्णयामुळे काँग्रेस संतप्त
एकीकडे एनडीएचे नेते सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते त्यावर टीका करत आहेत. २५ जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केल्यानंतर काँग्रेस नेते विवेक तनखा, पवन खेडा आणि प्रमोद तिवारी यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काँग्रेस नेते विवेक टंखा म्हणाले की, भारत सरकारकडून दरवर्षी २५ जून रोजी देशभरात आणीबाणी स्मृती दिन साजरा करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. ते म्हणाले की १९७५ ची घटना मांडणे हे भाजपची निराशा दर्शवते.

एनडीएत निराशा
निराशेतून ते हा ५० वर्षे जुना मुद्दा मांडत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, गेल्या महिन्याच्या चौथ्या दिवशी भाजपला ४४० व्होल्टचा एवढा करंट आला की, ४०० चे स्वप्न पाहणा-यांची संख्या २४० पर्यंत कमी झाली. राज्यघटना बदलण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. पण आता त्यांच्या स्वप्नात संविधान येऊ लागले, संविधानाच्या घोषणांनी संसद दुमदुमली, तेव्हा आता संविधान हत्या दिनाची चर्चा आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांना सांगितले की, गेल्या १० वर्षांत तुमच्या सरकारने दररोज संविधान हत्या दिन साजरा केला. तुम्ही देशातील प्रत्येक गरीब आणि वंचित घटकाचा स्वाभिमान प्रत्येक क्षणी हिरावून घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, जेव्हा मध्य प्रदेशातील भाजपचा नेता आदिवासींवर लघवी करतो किंवा जेव्हा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या दलित मुलीवर जबरदस्तीने अन्त्यसंस्कार केले, तेव्हा ही संविधानाची हत्या नाही तर काय आहे? दर १५ मिनिटांनी दलितांवर मोठा गुन्हा घडत असताना आणि दररोज सहा दलित महिलांवर बलात्कार होत असताना, ही घटना संविधानाची हत्या नाही तर काय आहे?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR