पुणे : प्रतिनिधी
तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत असून त्यानूसार जीवनशैलीतही अमूलाग्र बदल होत आहेत. परम संगणकाच्या निर्मितीपासून सुरू झालेला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवास कृत्रिम बुद्धीमत्तेचा साक्षीदार ठरत आहे असे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी वार्तालाप कार्यक्रमात सांगितले.
पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३५ वर्षे सातत्याने दिला जाणारा सन २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. भटकर म्हणाले की, विज्ञान आणि आध्यात्म या दोन्ही ज्ञान शाखांचा विस्तार आणि खोली प्रचंड असून एका मानवी जीवनात त्यांच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे केवळ अशक्य आहे. ज्यावेळेस संगणक क्रांती उदयास आली. त्यावेळेस अनेक युवक-युवती बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. परंतू, ती भीती भविष्याने फोल ठरवली असून संगणक क्रांतीमुळे रोजगाराच्या अनेक संधी आणि पर्याय उलब्ध झाले आहेत. तीच भीती एआयबाबत व्यक्त केली जात असून ही भीती देखील भविष्यात फोल ठरणार आहे असा विश्वास आहे.
तंत्रज्ञानाच्या अथवा विज्ञानाच्या प्रगतीमुळे नोक-यांचे स्वरूप बदलले असून हे युग ‘जॉब ट्रान्सफॉर्मेशन’चे मानावे लागेल. प्रचलित शिक्षण व्यवस्था भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणारी पिढी निर्माण करण्यात अपुरी असून काँटेंप्ट, न्यूट्रोनो एनर्जी, एआय यासारखे विषय विद्यार्थीदशेतच नव्या पिढीला शिकवले जाणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.