24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रआयएएस पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात!

आयएएस पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात!

पुणे : प्रतिनिधी
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकानंतर अनेक कारनामे समोर येत आहेत. आपल्या खासगी कारवर अंबर दिवा लावून अधिकारीपदाचा रुबाब केल्यानंतर आता खेडकर यांच्या आयएएस अधिकारीपदाच्या निवडीवरच शंका उपस्थित होत आहेत. कारण अंपगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून त्यांनी सनदी अधिकारीपदाची नोकरी मिळवली. मात्र, एमबीबीएसच्या शिक्षणाच्या वेळी त्यांनीच शारीरिकदृष्ट्या फीट असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. आता तर पिंपरी चिंचवड महापालिकेतून पायातील अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

वादाच्या भोव-यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांचे पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. डाव्या गुडघ्यात ७ टक्केवारीने त्या कायमस्वरूपी आधू असल्याचे या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट २०२२ रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिले होते. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसते, त्या अनुषंगाने त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवल्याने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र समोर आलेले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाबाबत संशय वाढला आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांची पुणे जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारीपदी बदली करण्यात आली. सध्या अकोला येथे त्यांना प्रकल्प अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून १९ जुलैपर्यंत त्यांना तेथील कार्यभार देण्यात आला आहे. दुसरीकडे त्यांच्यावरील आरोपांसाठी केंद्र सरकारने १ सदस्यीय समिती नेमली असून त्यांच्या यूपीएससी परीक्षेतील निवडींसदर्भाने चौकशी केली जात आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालानंतरच त्यांच्यावरील कारवाईचे स्वरूप समोर येणार आहे. परंतु दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

कमी दिसत असल्याचे
आम्हाला आढळले नाही
पूजा खेडकर यांनी ऑनलाइन पद्धतीने अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पूजा यांना बोलावून आम्ही तपासण्या केल्या. यात त्या ७ टक्के गुडघ्यात कायमस्वरूपी अधु असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार हे प्रमाणपत्र आम्ही दिले. मात्र, त्यांना कमी दिसत होते हे आमच्या तपासणीत आढळले नाही, असे पिंपरी चिंचवड वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे म्हणाले.

एमबीबीएसच्या प्रवेशावेळी फीट
पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात २००७ मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. त्यावेळी सीईटीद्वारे तिला प्रवेश मिळाला होता. तिथे प्रवेश घेताना आपण पूर्णत: फीट असल्याचे, तसेच कोणताही आजार नसल्याचे सर्टिफिकेट त्यांनी सादर केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना त्यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेत नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट सादर केले होते. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR