मुंबई : गेल्या पाच ते सहा दशकांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेली आयकॉनिक पद्मिनी प्रीमियर कंपनीची काळी-पिवळी टॅक्सी अखेर इतिहास जमा झाली आहे. शेवटच्या पद्मिनी प्रीमियर टॅक्सीची नोंदणी ताडदेव आरटीओत २९ ऑक्टोबर २००३ रोजी झाली होती. पद्मिनी प्रीमियर टॅक्सींना दिलेली २० वर्षांपर्यंतची आयुष्य मर्यादा संपल्याने शेवटच्या पद्मिनी प्रीमियरचा प्रवास संपला आहे. सध्या काळी-पिवळी टॅक्सी म्हणून विविध कंपनीच्या टॅक्सी शहरांमध्ये सुरू आहेत. परंतु ऐतिहासिक पद्मिनी प्रीमियर टॅक्सीचा प्रवास आता संपला आहे.
मुंबई आणि परिसरात एकेकाळी आलिशान समजली जाणारी काळी-पिवळी पद्मिनी प्रीमियर टॅक्सी मुंबईकरांची आवडती टॅक्सी होती. मात्र आता बदलत्या काळाबरोबर तिच्यानंतर आलेल्या कंपन्यांच्या कारना आरटीओने टॅक्सी म्हणून नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे. तसेच मोबाईल अॅपवरील खाजगी ओला-उबर टॅक्सीची सेवा देखील आली आहे. मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या शेवटच्या लाल रंगाच्या डिझेलवरील डबल डेकर बसला अलीकडेच निरोप देऊन त्या मोडीत काढल्यात आल्या.
आता याच मार्गावरून शेवटची पद्मिनी प्रीमियर टॅक्सी रस्त्यावरून कायमची हद्दपार झाली आहे.
‘यह मुंबई की शान है, और हमारी जान है’, असे शेवटच्या रजिस्ट्रेशन झालेल्या पद्मिनी प्रीमियर टॅक्सीचे मालक प्रभादेवीतील रहिवासी अब्दुल करिम कार्सेकर यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. मुंबईतील बेस्टच्या शेवटच्या डीझेल डबल डेकर बसची १५ वर्षांची आयुष्य मर्यादा संपल्यानंतर काही दिवसांत जुन्या पद्मिनी प्रीमियर टॅक्सी देखील निवृत्त झाल्याने मुंबईकरांच्या स्मृतीतील एकेक पान निखळत चालले आहे. मुंबईच्या वाहतुकीत मोलाची भूमिका बजावलेली दोन वाहतुकीची साधने एकामागोमाग काळाच्या पडद्याआड गेल्याने बेस्टच्या डबल डेकर बसप्रमाणे पद्मिनी प्रीमियर बस देखील इतिहासप्रेमींसाठी संग्रहालयात जतन करण्यात यावी अशी मागणी होत आहे.