जळकोट : प्रतिनिधी
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या लाडकी बहीण योजनेसाठी निकष आहे ते शासनाने ठरवून दिलेले आहेत. अनेक बहिणींनी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू केले आहेत. तसेच अंगणवाडी ताईकडे ऑफलाईन अर्ज देण्यात येत आहेत. परंतु अर्ज भरताना अर्जा सोबत बँकेचे पासबुक असणे देखील गरजेचे आहे. परंतु अनेक महिलांनी अद्याप पर्यंत बँकेमध्ये खाते उघडले नाही. नवीन खाते उघडण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता पात्र महिलांना करावी लागत आहे. यामुळे अशा महिलांना अर्ज सादर करण्यासाठी उशीर होत आहे. यामुळे सरकारने आता लाडकी बहीण योजनेसाठी पोस्टामधील खाते देखील ग्रा धरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पात्र महिलांकडे पोस्टाचे खाते असेल त्यांनी पोस्टाचे पासबुकची झेरॉक्स जोडावी तसेच ज्यांच्याकडे बँकेचे अथवा पोस्टाचे पासबुक नाही त्यांनी जळकोट तालुक्यातील पोस्टामध्ये खाते उघडून घेणे गरजेचे आहे.
जळकोट तालुक्यातील अनेक महिलांकडे बँकेचे खाते उघडले नाही. बँकेमध्ये नवीन खाते उघडायचे झाल्यास पॅन कार्ड लागत आहे. पॅन कार्ड शिवाय खाते उघडत नाही नवीन पॅन कार्ड काढणे व पॅन कार्ड मिळणे यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे. यामुळे या योजनेचे अर्ज भरण्यास उशीर लागत आहे. पॅन कार्ड शिवाय बँकेचे अधिकारी बँकेमध्ये खाते उघडत नाहीत. यामुळे महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु आता यांचे पोस्टात खाते असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे व ज्यांचे पोस्टातकिंवा बँकेमध्ये खाते नाही अशांना आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडणे अतिशय सोपे झाले आहे.
पोस्टमध्ये खाते उघडताना पात्र महिलेकडे जर पॅन कार्ड नसले तरीही पोस्टमध्ये खाते उघडून दिले जाणार आहे. परंतु खाते उघडल्यानंतर दोन महिन्यांमध्ये पोस्टमध्ये पॅन कार्ड जमा करावे लागणार आहे. पोस्टामध्ये नवीन खाते काढण्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स तीन फोटो लागणार आहेत. यामुळे जळकोट तालुक्यातील ज्या महिलांचे खाते नाहीकिंवा खाते नसल्यामुळे अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहे. अशांनी आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नवीन खाते काढून घ्यावे व पॅन कार्ड दोन महिन्यांमध्ये जमा करून घ्यावे, असे आवाहन जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे.