नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पूजा खेडकरसह देशभरातील काही आयएएस अधिका-यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले असतानाच यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपण्यासाठी अजून पाच वर्ष बाकी असताना सोनी यांनी राजीनामा दिल्याने यूपीएससीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोनी यांच्या राजीनाम्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
मनोज सोनी यांचा कार्यकाळ २०२९ मध्ये म्हणजे पाच वर्षानंतर संपणार होता. त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. सोनी हे २०१७ मध्ये यूपीएससीमध्ये सदस्य म्हणून आले होते. १६ मे २०२३ रोजी त्यांना यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससीचे अध्यक्ष बनवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाच्या अनुपम मिशन या संस्थेला सोनी हे अधिक वेळ देणार आहेत. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असे म्हटले जात आहे.
२०२० मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ते मिशनमध्ये एक साधू बनले होते. निष्काम कर्मयोगी म्हणून ते कार्यरत होते. दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाशी सोनी यांच्या राजीनाम्याचा काहीच संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. केवळ वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला आहे. सोनी हे तीनवेळा व्हाईस चान्सलर बनले होते. सर्वात कमी वयात कुलपती होण्याचा मान त्यांच्याकडे आहे. २००५ मध्ये ते देशातील सर्वात कमी वयाचे कुलपती बनले होते.
दरम्यान, मनोज सोनी यांच्या नियुक्तीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सवाल केला होता. सोनी यांना यूपीएससीचे चेअरमन बनवणे हे संविधान विरोधी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. सोनी हे आरएसएसच्या जवळचे आहेत. त्यामुळेच त्यांना चेअरमन करण्यात आले. सोनी यांना अध्यक्ष केल्याने यूनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन आता यूनियन प्रचारक संघ कमिशन बनेल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.