मुंबई : मोदी आणि शहा यांनी गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेली. आता पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीकरांना मुंबईतून हाकलून सर्व जमीन अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. उद्या मुंबईचे नाव बदलून अदानी सिटी करतील. मात्र आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. धारावीतील रहिवाशांना आहे तेथेच हक्काचे आणि ५०० चौरस फूटाचे घर मिळाले पाहिजे, असे ठणकावताना, धारावीचे टेंडर रद्द करा, अशी मागणी शिवसेना ( ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी काढलेल्या टेंडरमधील घोटाळा निदर्शनास आणला. लाडका मित्र, लाडका कॉन्ट्रॅक्टर आणि लाडका उद्योगपती योजना, अशी सरकारची योजना आहे. अदानीला टेंडर दिले त्यावेळी टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी आता त्यांना देत आहेत. त्या पैकी एक म्हणजे वारेमाप एफएसआय. धारावीचा ५९० एकरचा भूखंड आहे. त्यात तीनशे एकर हा गृहनिर्माणसाठी आहे.
बाकीच्या जागेत माहीम नेचर पार्क, मग टाटाचा पावर स्टेशन आहे. पण, एकूण टेंडरमध्ये कुठेही वाढीव टीडीआरचा उल्लेख नाही. आता घरांना नंबर देत धारावीकरांना पात्र-अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकवून हाकलून लावण्याचा डाव आहे. मात्र, आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही. पण पात्र-अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आहे. ही सगळी कारस्थाने मुंबईचे नागरी संतुलन बिघडवण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडायला लागले आहे. पण धारावी ही केवळ फक्त झोपडपट्टी नाही तर त्यात एक वेगळेपण आहे. तिथल्या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रोस्केलचा उद्योग चालतो. यामध्ये कुंभार, ईडलीवाले, चामड्याचा, गारमेंट उद्योगाचाही समावेश आहे. त्या उद्योगधंद्यांचे काय करणार, असा सवाल करत आजही हा प्रश्न अनुत्तरीत असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईभर अदानींकडून टीडीआर विकत घेतला पाहिजे, ही अट त्यांनी घातलेली आहे. या योजनांच्या धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे ते चांगभलं करताहेत हे आम्ही उघड करतोय, असा इशारा देतानाच बेसुमार टीडीआर काढून अदानीला देण्याचा डाव उधळून लावणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
धारावी नक्की कशी विकसित होणार याचा कुठेही उल्लेख नाही. पण अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहीत करत आहे. हे कोणासाठी करत आहेत, असा सवाल करत जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताहेत. वाघनखं नसले तरी सरकारी नख त्याला लावता आहात?, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
धारावीचे टेंडर रद्द करा!
धारावी पुनर्विकासासाठी काढलेल्या १८९ पानी टेंडरचा अभ्यास केला तर यामध्ये दिल्या जाणाठया सोयीसुविधांचा उल्लेख केलेला नाही, याकडे लक्ष वेधत उद्धव ठाकरे म्हणाले, ही मोठी फसवणूक आहे. यामध्ये कोणी सहभाग घेतला असेल त्यापैकी कोणी न्यायालयात गेले तर हे टेंडर रद्द होऊ शकते. त्यामुळे अदानीसाठी तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असाल तर हे टेंडर रद्द करा, अशी मागणी ठाकरेंनी केली. धारावीकरांना उचलून मिठागरांसह कुठेही टाकता येणार नाही. अदानींना जमत नसेल तर त्यांनी टेंडर सोडून द्यावे, असे आवाहन करत सरकाने पुन्हा नव्याने टेंडर काढावे आणि यामध्ये पारदर्शक देण्यात येणाठया सोयीसुविधा आणि अटी शर्तीचा उल्लेख करा, असे थेट आव्हान सरकारला दिले. मात्र,अदानीच्या घशात मुंबई टाकण्याचा जो डाव आहे तो शिवसेना उधळून लावणार असल्याचाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
अन्यथा पुन्हा आंदोलन !
धारावीकरांना मिठागरांच्या जागेवर पाठवले तर त्यासाठी पायाभूत सुविधा कोण देणार, असा सवाल करत दहिसर टोलनाका, मुलुंड टोलनाका येथेही जमिनी मागितल्या आहेत. त्यांना तेथे हलविले तर जिथे मुंबईचे इतर प्रकल्प आहेत जे मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी गरजेचे आहेत, तिथल्या जागा या अदानीच्या घशात घालायच्या. पुन्हा या जागांचा टीडीआर काढणार. मग या जागा अदानी सोडणार नाही, असा आरोप करत मग इथेही किती काळ धारावीकर राहणार?, असा सवाल करत याचा फटका मुंबईकरांनाही बसू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे मुंबई आणि धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही, असे ठणकावत आता पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, अशा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.