23.6 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रकर्जफेडीसाठी शेतक-यांवर अवयव विकण्याची वेळ यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव

कर्जफेडीसाठी शेतक-यांवर अवयव विकण्याची वेळ यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या शेतक-यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली असून भाजपाच्या कार्यकाळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे; पण राज्यातील भाजप सरकारला त्याची लाज वाटत नाही, अशी प्रखर टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.

बँकेचे कर्ज फेडण्यासाठी शेतक-यांनी किडनी, लिव्हर विकायला काढल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. किडनी ७५ हजार रुपये, लिव्हर ९० हजार रुपये व डोळे २५ हजार रुपयांना मिळतील, अशी जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या बाबत बोलताना नाना पटोले यांनी भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली. राज्यातील काही भागांत ओला दुष्काळ पडला आहे तर काही भागांत कोरडा दुष्काळ पडला आहे, शेतमालाला भाव नाही, सोयाबीन, कापूस, डाळी, कांद्यासह भाजीपाला व फळभाज्यांना भाव नाही, कर्जाचा डोंगर उभा आहे, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत आणि मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र शेतक-यांना भरघोस मदत केल्याच्या पोकळ घोषणा करीत आहेत.

अवकाळीच्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, कर्जमाफीतील प्रोत्साहनपर ५० हजार रुपयेही अनेक शेतक-यांना मिळालेले नाहीत. सरकारचे अधिकारी-कर्मचारीच ५० पैशांची आणेवारी दाखवतात मग दुष्काळ कसा जाहीर करणार? सरकारने दुष्काळ जाहीर करण्यातही राजकारण केले. सरकारी खरेदी केंद्रेही सुरू झालेली नाहीत. ‘शासन आपल्या दारी’ म्हणत जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. या वर्षीचा खरीप वाया गेला, पिकं शेतातच करपून गेली आता रबीही हातातून गेल्यात जमा आहे. पेरणीचा खर्चही निघत नाही, ही अवस्था आहे. सरकारला मात्र शेतक-यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशा शब्दांत सरकारवर हल्ला चढवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR