37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रातील संपूर्ण शेतक-यांची कर्जमाफी करा

महाराष्ट्रातील संपूर्ण शेतक-यांची कर्जमाफी करा

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतक-यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, पहिल्याचा दिवशी सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या आहेत. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद्राने तत्काळ मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांना आर्थिक मदतीची गरज असून जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.

लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहे. काही जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झाला नाही. त्यामुळे अशाठिकाणी कोरडा दुष्काळ पडला आहे. वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक-यांची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रमधील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आला असल्याच्या सुळे म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्रात कोठे ओला तर कोठे कोरडा दुष्काळ
राज्यात कुठे ओला दुष्काळ तर कोठे कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने तत्काळ महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी. तसेच महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी. तसेच कष्ट करणा-या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतक-यांची कर्जमाफी करण्यात यावी. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, अशी मागणी सुळे यांनी केली.

हवामान बदलाचा फटका
महाराष्ट्रातील शेतक-यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे बँकेतून त्यांना कर्ज दिले पाहिजे. सोबतच हवामान बदलाचा देखील त्यांना फटका बसत असून यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आपल्यावर जेव्हा संकट येते त्यावेळी शेतकरी मदतीला धावून येत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतक-यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR