मुंबई : पाणी, आरोग्य, नोकरी यासारख्या प्रश्नांवर वेळ द्यायला कुणी तयार नाही. आपल्याकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ हे सुरू आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते त्यासाठी योजना कशाला हवी? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
वांद्रे येथे मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर भाष्य करत पदाधिका-यांना सूचना केल्या.
राज ठाकरे म्हणाले की, बहिणीला दीड हजार रुपये देणार, यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत का?, रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सरकारकडे पैसे नाहीत. महाराष्ट्रातील मूळ प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हेच येणा-या विधानसभेत तुमचा प्रचार आणि पक्षाचं कॅम्पेन असलं पाहिजे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.