मुंबई : प्रतिनिधी
राज्यात साथीच्या आजारांमध्ये मलेरिया आजारांचा जोर हा इतर आजारांच्या तुलनेमध्ये वाढता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इतर आजारांच्या तुलनेमध्ये मलेरिया झालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे.
मलेरियामुळे जानेवारी ते २१ जुलै २०२४ या कालावधीमध्ये ६ जणांचा मृत्यूही झाला आहे. या कालावधीमध्ये डेंग्यूमुळे ३ जणांना जीव गमवावा लागला. ७,४४७ जणांना मलेरिया, तर ४,९६५ जणांना डेंग्यूची लागण झाली. चिकुनगुनिया झालेल्या रुग्णांची संख्या १,०७५ इतकी आहे.
जानेवारी ते जुलै २०२३ या काळात मलेरियाची रुग्णसंख्या १६ हजार १५९ इतकी होती. त्या वर्षात मलेरियामुळे २९ जणांना प्राण गमवावे लागले होते. या वर्षात डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही मलेरियाच्या रुग्णांपेक्षा अधिक होती. २१ जुलै २०२३पर्यंत राज्यात ५९ जणांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला होता. सन २०२३मध्ये चिकुनगुनियाच्या १,७०२ रुग्णांची नोंद झाली. या आजारामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. २१ जुलै २०२४पर्यंत राज्यात १,०७५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमातंर्गत मिळालेल्या माहितीमधून दिसून येते.