जिंतूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील महिलांची संबंधित कार्यालयात गर्दी होत आहे. या योजनेसाठी तालुक्यातून ४५ हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. हा आकडा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा सर्वाधिक असून जिंतूर तालुका हा परभणी जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
या योजने संदर्भात अनेक महिलांना समस्या उद्भवत आहेत. त्याबाबत जिंतूर तहसीलदार राजेश सरवदे यांच्या दालनात शिवसेना शिंदे गट पक्षाचे तालुकाप्रमुख ऍड. सुनील बुधवंत यांनी दि. ३१ जुलै रोजी बैठक घेऊन तालुक्यातील महिलांना या योजनेत पात्र होण्यासाठी येणा-या विविध समस्या त्वरित सोडवून जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा कसा होईल यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे म्हणून आवाहन केले आहे.
तहसीलदारांची भेट झाल्यानंतर पत्रकारांना संबोधन करताना ऍड. बुधवंत यांनी लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी निधी वगैरे नसल्याच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन केले. लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार असून सध्या या प्रक्रियेने वेग घेतला आहे. आता काही निवडक महिलांच्या खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया बँक खात्यात जमा केला जात असून हा तांत्रिक प्रक्रियेचा तथा पडताळणीचा भाग आहे.
लवकरच पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार असल्यामुळे ज्या बहिणींचे अर्ज भरण्याचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे. अर्ज भरण्यासाठी ऑगस्ट अखेर पर्यंतची मुदत आहे अशी माहिती दिली. तसेच या योजनेसाठी तालुक्यातील प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीची माहिती तथा अहवाल शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सादर करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिवसेना पक्षाचे अशोक देशमुख, सोपान पालवे, रविशंकर पालवे, संतोष घुगे, मुंजाजी पालवे, किशन घुगे, सुखदेव पालवे यांची उपस्थिती होती.