ताडकळस : साखर कारखान्यांकडे निर्धारित मुल्याची रक्कम राहिलेली असल्यास ती लवकरात लवकर देण्यासाठी संघटनेने त्यांना निवेदन देण्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच निर्धारित मुल्यांची रक्कम न दिल्यास पुढील हंगामामध्ये कारखान्यातील साखर व त्यांचे वाहने चालू देणार नाही असा इशारा खा. शेट्टी यांनी ताडकळस येथील शेतक-यांशी संवाद साधताना दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. शेट्टी हे दिनांक ३१ जुलै रोजी ताडकळस मार्गे नांदेडकडे मराठवाडा विभागीय बैठकीसाठी जात असताना त्यांचे ताडकळस येथे आगमन होताच ताडकळस व परिसरातील शेतक-यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी खा. शेट्टी म्हणाले शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते अतोनात मेहनत करतात. पण राजकारणामध्ये त्यांना पाठबळ द्या. येणा-या विधानसभेला शेतकरी पुत्राला निवडून देण्याचे आवाहन माजी खा. शेट्टी यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्यासोबत स्वस्तिक पाटील, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, राम कोळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी माजी खा. शेट्टी यांचे स्वागत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पंडित भोसले, साहेब शिंदे, सुदर्शन अंबोरे, माखणी येथील प्रगतीशील शेतकरी जनार्दन आवरगंड, महेश अंबोरे, आत्माराम अंबोरे, सचिन शिंदे, नागेश दुधाटे, संभाजी भोसले, मारोतराव भोसले, सतीश भोसले, श्याम अंबोरे, बाळासाहेब अंबोरे, सदाभाऊ भोसले यांच्यासह ताडकळस व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.