नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वायनाडपाठोपाठ हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्यानं हाहा:कार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आतापर्यंत ३० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याला दुजोरा दिला.
दिल्लीसह देशातील अनेक शहरात पावसामुळे विध्वंस झाल्याचे पाहायला मिळाले. मान्सूनने देशाच्या मोठ्या भागांत धुमाकूळ घातला. बुधवारी दिल्लीत विक्रमी पाऊस झाला. तसेच हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्याजवळ ढगफुटी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात सुमारे ३० लोक बेपत्ता झाले आहेत तर ४ जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या टिहरी गढवालमध्येही ढगफुटीची घटना घडली.
कुल्लू, मंडीमध्ये हाहा:कार
हिमाचल प्रदेशातील २ जिल्ह्यांत ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात ढग फुटण्याच्या घटना घडल्या. कुल्लूच्या रामपूर भागातील समेज येथील पॉवर प्लांट प्रकल्पातील अनेक लोक ढग फुटीनंतर बेपत्ता आहेत. २० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली असून अनेक वाहनें वाहून गेली. परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्ह्यातही अनेकजण बेपत्ता आहेत.
बचाव कार्य वेगात
घटनेची माहिती मिळताच डीएसआरएफ, पोलीस दल आणि बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यामुळे मदत व बचावकार्य वेगात सुरू झाले आहे. प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफ, स्थानिक पोलिस दल आणि स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत.
घर, पूल, जेसीबी मशीन वाहून गेले
घणवी येथे ढगफुटीमुळे आलेल्या पुराची तपासणी केली असता ढगफुटीमुळे ५ घरे, २ फूट पूल, शाळा इमारत, रुग्णालय, वीज प्रकल्पाचे विश्रामगृह, एक जेसीबी मशीन आणि तीन छोटी वाहने वाहून गेली. घरे उद्ध्वस्त झाली. तसेच अनेकजण बेपत्ता आहेत.